गोमूत्र आणि आयुर्वेदिक उपचारानं लम्पीवर मात, नागपुरातील गौ विज्ञान अनुसंधान केंद्राचा दावा
Lumpy Skin Diseas : देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या लम्पी आजारानं महाराष्ट्रात सुद्धा पाय पसरले आहेत. राज्यातील 30 जिल्ह्यात या आजाराचा शिरकाव झालाय.
Lumpy Skin Diseas : देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या लम्पी आजारानं महाराष्ट्रात सुद्धा पाय पसरले आहेत. राज्यातील 30 जिल्ह्यात या आजाराचा शिरकाव झाल्याची माहिती राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. लम्पी आजारावर मात करण्यासाठी देशभरात प्रयत्न केले जात आहेत. लसीकरणासह क्वारंटाईनही करण्यात येत आहे. जनावरांमध्ये पसरलेल्या लम्पी त्वचा रोगावर गोमूत्र आणि इतर आयुर्वेदिक उपचार परिणामकारक ठरत असल्याचं समोर आलं आहे. नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथील गौ विज्ञान अनुसंधान केंद्राच्या वैद्यांचा दावा आहे की गौमूत्रवर आधारलेल्या पद्धतीने त्यांच्या गौशाळेतील सुमारे 850 गौवंशीय प्राणी लम्पी मुक्त आहेत.
गोमूत्र आणि शेण याच्या आयुर्वेदीय फायद्या विषयी सकारात्मक चर्चा ऐवजी नेहमीच नकारात्मक दृष्टीने राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्येच त्यांचा वापर होतो. मात्र, आता तेच गोमूत्र लम्पी रोगाशी लढण्यामध्ये मदतगार ठरणार आहे. नागपूर जिल्ह्यातील देवलापार गौ विज्ञान अनुसंधान केंद्राच्या प्रधान वैद्य डॉ नंदिनी भोजराज यांच्या मते स्वस्थ देशी गायीचा गोमूत्र उकळून थंड केल्यावर लम्पी सदृश्य लक्षण असलेल्या प्राण्यांना प्यायला दिले, तर त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढून ते लम्पी मुक्त होऊ शकतात. तर ज्या प्राण्यांना लंपीचा प्रादुर्भाव अद्याप झालेला नाही, त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढून ते लम्पी रोगाशी लढा देऊ शकतात.
गौवंशीय प्राण्यांना गोमूत्र देण्याची पद्धत -
एक वर्षापेक्षा मोठ्या प्राण्यांना 100 मिलीलिटर गोमूत्र उकळून द्यावे.
एका वर्षापेक्षा मोठ्या वासराला 50 मिलीलिटर गोमूत्र उकळून द्यावे.
सोबतच कडुलिंब - अढुळसा- गुळवेल - हळद - आजण(अर्जुन) या सर्वांचा अर्धा किलोचा पाला खायला द्यावा..
गोवंशी प्राण्यांच्या गोठ्यामध्ये रोज संध्याकाळी धुरणी करावी.
भोजराज यांचा दावा आहे की याच पद्धतीने त्यांनी 2018-19 मध्ये झालेल्या लम्पीच्या प्रादुर्भावापासून गोशाळेतील गोवंशीय प्राण्यांना वाचवले होते. यावर्षीही देवलापार येथील गो शाळेतील साडेआठशे गोवंशीय प्राणी पूर्णपणे स्वस्थ आहे.
सध्या ग्रामीण भागामध्ये लम्पी या रोगामुळे भीतीचे वातावरण आहे. शासनाने संक्रमित प्राण्यांच्या विलगीकरणाची तसेच ज्या भागात संक्रमण आढळत आहे त्याच्या पाच किलोमीटरच्या परिसरात लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. मात्र तरीही रोज लम्पी बाधित गावांची संख्या वाढत आहे. अशात गावोगावी उपलब्ध असलेल्या गोमूत्र सारख्या साधनाने जर लम्पीचा सामना करणे शक्य असेल. तर नक्कीच शेतकऱ्यांना त्या संदर्भातला योग्य प्रशिक्षण देऊन शेतकऱ्यांच्या पशुधन वाचवण्यासाठीची मोहीम शासनानेच हाती घेणे आवश्यक असल्याचं अनेकजण म्हणत आहेत.