(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nandurbar Rain : नंदूरबारमध्ये सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस, शेतकऱ्यांसह मिरची व्यापाऱ्यांना मोठा फटका, 2 ते 3 कोटींच्या नुकसानीचा अंदाज
नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात देखील सलग तिसऱ्या दिवशी परतीच्या पावसानं हजेरी लावली आहे. याचा शेतकऱ्यांसह मिरची व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
Nandurbar Rain news : राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं शेतकरी मात्र, संकटात सापडला आहे. शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं पाण्यात असल्यानं त्यातून उत्पन्न मिळण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात देखील सलग तिसऱ्या दिवशी परतीच्या पावसानं हजेरी लावली आहे. याचा शेतकऱ्यांसह मिरची व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. खरेदी केलेल्या लाल मिरचीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पावसामुळं मिरची व्यापाऱ्यांचे दोन ते तीन कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा बाजार समितीचा प्राथमिक अंदाज आहे.
नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत आतापर्यंत पंचवीस हजार क्विंटल मिरचीची खरेदी झाली आहे. ही मिरची वाळवण्यासाठी पठाऱ्यांवर टाकली जाते. मात्र, पावसामुळं वीस हजार क्विंटल पेक्षा अधिक मिरची पावसाच्या पाण्यात सापडल्यानं दोन ते अडीच कोटी रुपयांचं नुकसान झालं असल्याचे बाजार समितीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. मिरची वाढण्यासाठी 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागत असतो. मात्र, रात्री झालेल्या परतीच्या पावसामुळं मिरची पावसात भिजून व्यापाऱ्यांचे जवळपास 30 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नुकसान दोन ते अडीच कोटीच्या घरात असल्याचा अंदाज नंदुरबार बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी व्यक्त केला आहे. रात्री झालेल्या पावसामुळं मिरचीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, आजही परतीचा पाऊस झाला तर व्यापाऱ्यांचे 50 टक्के पेक्षा अधिक नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
खरेदी केलेल्या मिरचीला विमा सुरक्षा कवच द्यावं
नंदूरबार जिल्ह्यात परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. याचा शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. कोट्यावधी रुपयांच्या लाल मिरचीचे नुकसान झालं आहे. त्यामुळं या नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. परतीच्या पावसामुळं शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. नंदूरबार बाजार समितीत ओली मिरची खरेदी करुन पथार्यांवर वाळवण्यासाठी टाकली जात असते. मिरचीचा हंगाम सुरु झाला असून व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली हजारो क्विंटल मिरची परतीच्या पावसात ओली होऊन खराब झाली आहे. हजारो क्विंटल मिरची पावसात सापडल्याने व्यापाऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. परतीच्या पावसामुळं नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी मिरची व्यापारी संघटनेच्यावतीनं करण्यात आली आहे. खरेदी केलेल्या मिरचीला विमा सुरक्षा कवच द्यावे अशी मागणी देखी ल व्यापाऱ्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: