Farmers Protest : हरियाणातील शेतकरी आंदोलनाला यश, अखेर मागण्या मान्य; हमीभावानं होणार सूर्यफुलाची खरेदी
हरियाणातील (Haryana) शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला यश आलं आहे.
Haryana Farmers Protest: हरियाणातील (Haryana) शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला यश आलं आहे. अखेर सरकारनं सूर्यफुलाची हमीभावानं खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. हमीभावाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कुरुक्षेत्रमध्ये दिल्ली-चंदीगड महामार्ग जाम करून धरणे आंदोलन सुरु केलं होतं.
MSP साठी आम्ही देशभरात लढा देत राहू : राकेश टिकैत
शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर हरियाणा सरकारनं सूर्यफुलाची हमीभावानं खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा शेतकऱ्यांचा अंतिम विजय नाही. अंतिम विजय तेव्हाच होईल जेव्हा सरकार देशभरात एमएसपीचा कायदा करेल अशी भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी मांडली. आम्ही आमचा विरोध संपवत आहोत. बंद केलेले रस्ते आम्ही खुले करत असल्याची भूमिका शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पत्रकार परिषदेत मांडली. आमचे पीक एमएसपीवर खरेदी करण्यात यावे यासाठी आम्ही आंदोलन करत होतो. एमएसपीसाठी आम्ही देशभरात लढा देत राहू असेही टिकैत म्हणाले. ज्या आमच्या शेतकरी नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, त्यांची देखील लवकरच सुटका होईल. तसेच आमच्या नेत्यांवर दाखल केलेले खटले मागे घेतले जातील असे ते म्हणाले. आम्ही आठवडाभर संघर्ष केला, त्यानंतर सर्वांच्या सहकार्याने सरकारने आमची मागणी मान्य केली आहे. आम्ही कोणाकडेही झुकणार नाही, आम्ही आमचा हक्क मागितला असल्याचे टिकैत म्हणाले.
काय म्हणाले राकेश टिकैत?
आमच्यावर दबाव होत. शेतकरी आंदोलनासंदर्भात अनेक ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले होते असेही टिकैत म्हणाले. संपूर्ण देशाची संपत्ती एका व्यक्तीला विकली जात आहे. आमचा निवडणुकीशी काहीही संबंध नसल्याचे टिकैत म्हणाले. एमएसपीचा मुख्य प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यासाठी आमचा लढा सुरु राहणार असल्याचे राकेश टिकैत म्हणाले.
हरियाणा सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.
हरियाणा सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहिले आहे. मुख्यमंत्र्यांनी सूर्यफूल पिकासाठी एमएसपी वाढवण्यास सहमती दर्शवली असल्याचे कुरुक्षेत्रचे एसपी सुरिंदर सिंग भोरिया म्हणाले. त्यामुळं शेतकऱ्यांनी हे आंदोलन थांबवावं असं आवाहन सुरिंदर सिंग भोरिया यांनी केलं आहे. हरियाणा सरकार आणि पोलिस शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचेही ते म्हणाले.
कुरुक्षेत्रमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन
एमएसपी दराने सूर्यफुलाचे बियाणे खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी होती. त्यासाठी त्यांनी सोमवारी दुपारपासून कुरुक्षेत्रातील पिपलीजवळ महामार्ग (NH-44) रोखून धरला होता. हा महामार्ग दिल्ली ते चंदीगड आणि इतर काही मार्गांना जोडतो. यापूर्वी सोमवारी रात्रीपासून ते मंगळवारपर्यंत शेतकरी आणि जिल्हा प्रशासन यांच्यात अनेकवेळा चर्चेच्या फेऱ्या झाल्या, मात्र कोणताही निकाल लागला नव्हता. मात्र, त्यानंतर सरकारनं मागण्या मान्य केल्यानंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: