'FRP दोन टप्यात देण्याच्या निर्णयाने शेतकरी उपाशी, कारखानदार तुपाशी!' सदाभाऊ खोतांचं 26 फेब्रुवारीला आंदोलन
आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. FRP दोन टप्यात देण्याचा निर्णय पाठीमध्ये खंजीर खुपसणारा आहे. या निर्णयाविरोधात आंदोलनाची घोषणा खोत यांनी केली आहे.
सांगली : FRP दोन टप्यात देण्याचा निर्णय घेऊन महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi) ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या (sugarcane Farmers) पाठीमध्ये खंजीर खुपसला आहे. 'साखर कारखानदार तुपाशी अन् माझा शेतकरी उपाशी'अशा पद्धतीचा निर्णय या सरकारने घेतलेला आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे नाही तर शेतकऱ्यांना मातीत घालणारं आहे, अशी टीका माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. सरकारच्या या निर्णय विरोधामध्ये येत्या 26 फेब्रुवारीला अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथून रयत क्रांती संघटना व भाजप किसान मोर्चा अशी संयुक्तरित्या आंदोलनाची करणार असल्याची घोषणा देखील खोत यांनी केली आहे.
सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे की, महाविकास आघाडी सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला आहे. शुगर केन कंट्रोल अॅक्ट 1966 नुसार शेतकऱ्यांना केंद्र सरकारने जाहीर केलेली FRP ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत एकरकमी मिळाली पाहिजे हा कायदा होता, पण या कायद्याची पायमल्ली करण्याचं काम राज्य सरकार करत आहे. ही FRP आता दोन टप्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. पहिला टप्पा हा पश्चिम महाराष्ट्र, खानदेशासाठी 10% रिकव्हरीचा आहे. दुसरा टप्पा मराठवाडा विदर्भसाठी 9.5% रिकव्हरीचा आहे.
याच्यातून तोडणी वाहतूक वजा करायची आहे. दुसरा हप्ता साखर कारखान्याचा गाळप हंगाम संपल्यानंतर 15 दिवसांनी द्यायचा आहे आणि कारखान्याने केलेले जे खर्च आहेत, ते सर्व खर्च वजा करून राहिलेले पैसे शेतकऱ्याला द्यायचे आहेत. याचा अर्थ सरळ आहे कि, "साखर कारखानदार तुपाशी अन् माझा शेतकरी उपाशी" अशा पद्धतीचा निर्णय या सरकारने घेतलेला आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे नाही तर शेतकऱ्यांना मातीत घालणारं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
खोत यांनी म्हटलं आहे, असं हे शेतकरीद्रोही सरकार या राज्यांमध्ये काम करत आहे आणि या सरकारच्या विरोधामध्ये येत्या 26 फेब्रुवारीला शिर्डी जि. अहमदनगर येथून रयत क्रांती संघटना व भाजपा किसान मोर्चा अशी संयुक्तरित्या आंदोलनाची घोषणा करत आहे. या सरकारच्या विरोधामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन उभे केले जाईल, अशी माहिती माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या