Mosambi : एकीकडं मोसंबी गळती तर दुसरीकडं गोगलगायींचा मारा, जालना आणि छत्रपती संभाजीनगरच्या बळीराजासमोर दुहेरी संकट
जालना (jalna), छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) मोसंबी उत्पादक शेतकरी गोगलगाईचा मारा आणि फळगळतीमुळं हैराण झाला आहे.
Agriculture News : मोसंबी (Mosambi) हब अशी ओळख असलेल्या जालना (jalna), छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) शेतकरी गोगलगाईचा मारा आणि फळगळतीमुळं हैराण झाला आहे. सध्या मोसंबीच्या बागेत फळाऐवजी गोगलगाईच जास्त लगडल्याचं चित्र दिसत आहे. यामुळं झाडे जळून चालली आहे. तर दुसरीकडं फळांना लागल्यामुळं मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे. त्यामुळं मोसंबी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
सध्या मोसंबीच्या झाडाखाली फळांचा सडा दिसत आहे, तर झाडांवर गोगलगायींचं पीक अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं मोसंबीचा आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला बळीराजा संकटात सापडला आहे. अत्यल्प पाऊस आणि ढगाळ वातावरणानं मोसंबी उत्पादक शेतकरी फळगळीच्या समस्येशी झुंजत आहे. अनेक भागात मोसंबीची मोठ्या प्रमाणावर गळ होत असल्यानं शेतकरी चांगलेच धास्तावलेत. सध्या झाडावर आंबिया बहराची फळ लगडली असून, वातावरणातील या बदलाने फळे पिवळे पडून जमिनीवर पडू लागली आहेत. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यानं फळगळ, तज्ज्ञांची माहिती
जालना जिल्ह्यातील बदनापूर, अंबड, घनसावंगी तालुक्यात तर याचे प्रमाण जास्त आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात मोसंबीचे उत्पादन जास्त होते. इथलेही शेतकरी फळगळतीमुळं हैराण झाले आहेत. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यानं ही गळ होत असल्याची तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. मात्र, सर्वच उपाय करुनही उपयोग होत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.
तज्ज्ञांचा शेतकऱ्यांना नेमका सल्ला काय?
दरम्यान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ढगाळ वातावरण, अत्यल्प पाऊस आणि अन्नद्रव्याच्या अभावामुळं ही फळगळ होत आहे. या काळात त्यावर उपाय म्हणून बागेचं योग्य व्यवस्थापन तसेच फवारणी करणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी अर्धा मिली प्लॅनोफिक्स, 10 ग्राम युरिया, बविस्टीन 1 ग्रॅम अशी प्रतिलिटर पाण्यात टाकून फवारणी केली तर यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. तसेच फळगळ रोखली जाऊ शकते अशी माहिती जालना जिल्ह्यातील बदनापूर मोसंबी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी दिली.
पावसानं ओढ दिल्यामुळं पीकं सुकायला लागली आहेत. मोसंबीला फळ लगडली आहेत, मात्र ती मोठी होण्याच्या आधीच त्याला गळती लागली आहे. त्यामुळं चहू बाजूनं शेतकरी समस्यांनी घेरला आहे. याचा मोठा आर्थिक फटका बळीराजाला बसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: