(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nitin Gadkari : मोसंबीसह संत्र्यापासून तयार होणाऱ्या उत्पादनांसाठी 'नागपूर ऑरेंज' ब्रँड तयार व्हावा, नितीन गडकरींचा सल्ला
मोसंबी आणि संत्र्यापासून तयार होणाऱ्या उत्पादनांसाठी 'नागपूर ऑरेंज' नावाचा एक ब्रँड तयार करण्याचा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला.
Nitin Gadkari : ब्रॅण्डला सर्वात जास्त महत्व आहे. त्यामुळं नागपूरी संत्र्याची (Nagpur Orange) जाहिरात झाली पाहिजे असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी केलं. मोसंबी आणि संत्र्यापासून तयार होणाऱ्या उत्पादनांसाठी 'नागपूर ऑरेंज' नावाचा एक ब्रँड तयार करण्याचा सल्लाही गडकरींनी दिला. नागपुरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऍग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनात (Agro Vision Agricultural Exhibition) गडकरी बोलत होते.
आजच्या काळात पॅकिंगला महत्त्व
आजच्या काळात सर्वत्र ब्रॅण्डला महत्व आहे. त्यामुळं नागपूरी संत्रा म्हणून विदर्भाचं मुख्य फळपीक असलेल्या संत्र्याची जाहिरात झाली पाहिजे, असं नितीन गडकरी म्हणाले. जोपर्यंत कोणीतरी श्रीदेवी सांगत नाही की, गडकरीकडचा साबण लावलं आणि मी गोरी झाली, तोपर्यंत गल्लीतली श्रीदेवी तो साबण वापरत नाही. मग साबण कितीही चांगला असू दे अशी मिश्किल टिप्पणी देखील यावेळी गडकरींनी केली. बाजारात साहित्य विकणं ही एक कला आहे. ते फक्त चांगलं असून भागत नाही, तर चांगला दिसणंही आवश्यक आहे. आजच्या काळात पॅकिंगला महत्त्व असल्याचे गडकरी म्हणाले. शेतमालापासून विविध उत्पादन तयार करणाऱ्या लहान उद्योजकांना उत्कृष्ट मार्केटिंग तंत्राचा सल्लाही यावेळी दिला.
शेतमाल आधारित उत्पादनाला एक ब्रँड मिळावा
शेती क्षेत्रात यश मिळवण्यासाठी जमीन चांगली करणे, कसदार करणे आवश्यक आहे. त्यानंतर दर्जेदार रोपे तयार करणे आणि आपलं उत्पादन वाढवणे हे शेतीतल्या यशाचा एक भाग असल्याचे नितीन गडकरी यावेळी म्हणाले. तयार झालेल्या उत्पादनांची चांगली मार्केटिंग करणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी ब्रॅण्डिंग करणे आवश्यक आहे. त्यामुळं संत्रा आणि मोसंबीपासून तयार होणाऱ्या विविध उत्पादनांसाठी 'नागपूर ऑरेंज' नावाची एक ब्रँड तयार करावी असा सल्लाही यावेळी गडकरी यांनी दिला. शेतमाल आधारित उत्पादनाला एक ब्रँड मिळाला तर लोक त्या उत्पादनांचा सहज स्वीकार करतात असेही गडकरी म्हणाले.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे कृषी संमेलन केंद्र स्थापन होणार
देशाचे पहिले कृषीमंत्री दिवंगत डॉ. पंजाबराव देशमुख (Dr. Panjabrao Deshmukh) यांच्या नावाने पश्चिम नागपुरातील दाभा येथील कृषी विद्यापीठाच्या मैदानात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कृषी संमेलन केंद्र स्थापन होणार आहे. यासाठी 150 कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. विदर्भातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे गडकरी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: