Bjp Agitation : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी केजरीवाल यांच्या घरासमोर आंदोलन, भाजप किसान मोर्चा आक्रमक
भाजप किसान मोर्च्याच्या वतीनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं.
Bjp Agitation : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजप किसान मोर्च्याच्या वतीनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं. विविध मागण्यांसाठी गेल्या 40 दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. अद्याप त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळं भाजप किसान मोर्च्याच्या नेतृत्त्वात केजरीवाल यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात 360 गावांतील शेतकरी निषेध करण्यासाठी पोहोचले होते.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, पिकाचे नुकसान झाल्यास 50 हजारांपर्यंत नुकसान भरपाई आणि सिंचनासाठी वीज दरात अनुदान या मुख्य मागण्या आहेत. यासह दुसऱ्याही काही मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. या निदर्शनात दिल्ली भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता, एलओपी रामवीर सिंग बिधुरी, दिल्ली भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष विनोद सेहराव यांच्यासह भाजपचे इतर नेते आणि महामंत्री उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारे दिल्ली भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, गेल्या 40 दिवसांपासून दिल्लीतील शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. केजरीवाल यांच्या धोरणांबद्दल दिल्लीतील 360 गावांमध्ये प्रचंड संताप आहे. एखाद्या शेतकऱ्याने शेतजमिनीवर काही बांधकाम केले की, संपूर्ण जमीन जप्त करुन ग्रामसभेला दिली जाते. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत कराव्यात अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
केजरीवाल यांनी दिल्लीच्या ग्रामीण भागातील शेतकर्यांना 20 हजारांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे, ती खूपच कमी आहे. या शेतकऱ्यांना किमान 50 हजार नुकसानभरपाई द्यावी. दिल्लीचे शेतकरी व्यावसायिक वाहन म्हणून ट्रॅक्टर खरेदी करतात, त्यांना अनुदान मिळत नाही. इतर राज्यात ट्रॅक्टर खरेदीवर शेतकऱ्यांना अनुदान मिळते, मग इथे का नाही? असा सवाल देखील यावेळी भाजप किसान मोर्च्याच्या वतीनं करण्यात आला. इतर राज्यांप्रमाणे त्यांनाही अनुदान देण्यात यावं आणि 21 कलमी मागण्या पूर्ण कराव्यात, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. शेतकऱ्यांचे क्रेडिट कार्ड असो, पीक विमा योजना असो की किसान सन्मान निधी भाजपने शेतकऱ्यांच्या हिताचे काम केले आहे. किसान सन्मान निधी योजना ही देशातील सर्वात मोठी योजना आहे. शेतकर्यांना 6000 रुपये दिले असल्याचे भाजप किसान मोर्च्याच्या वतीनं सांगण्यात आले.
केजरीवाल यांनी जाहीर केलेली नुकसानभरपाई शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. कारण, अनेक अधिकाऱ्यांनी यामध्ये घोटाळा केल्याचा आरोपही भाजप किसान मोर्चाच्या वतीनं करण्यात आला. मला केजरीवालांना सांगायचे आहे की, ही लोकांची लढाई आहे. दिल्लीच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा आवाज दाबू नका, कारण ज्यांनी शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला ते सत्तेतून बाहेर पडले असल्याचे भाजप किसान मोर्चानं म्हटले आहे.