T20 World Cup 2021 Record: आयर्लंडच्या Curtis Campherचा पराक्रम, लागोपाठ चार चेंडूंत चार विकेट्स
आयर्लंडचा वेगवान गोलंदाज कर्टिस कॅम्फरनं युएईतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात लागोपाठ चार चेंडूंत चार विकेट्स काढून लसिथ मलिंगा आणि राशिद खान यांच्या पंक्तीत बसण्याचा मान मिळवला. कॅम्फरनं नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात दहाव्या षटकात हा पराक्रम गाजवला. नेदरलँड्सच्या फलंदाजांनी त्याच्या पहिल्या षटकात १२ धावा चोपून काढल्या होत्या. पण पुढच्याच षटकात त्यानं कॉलिन अॅकरमन, रायन टेन डेशॉ, स्कॉट एडवर्डस आणि रूलॉफ वॅन डेर मर्व्हे या चार फलंदाजांना लागोपाठच्या चार चेंडूंवर माघारी धाडलं. ट्वेन्टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सामन्यात हॅटट्रिक घेणारा तो आयर्लंडचा पहिला गोलंदाज ठरला आहे. कर्टिस कॅम्फरच्या याच कामगिरीच्या जोरावर आयर्लंडनं नेदरलँड्सवर सात विकेट्सनी मात केली.





















