Mayor On Vaccination : लस घेण्यासाठी नागरिकांनी आधी खात्री करुन जावं, महापौरांची सूचना
मुंबई : सध्या देशासह राज्यातही कोरोना रुग्णसंख्येचा चढता आलेख पाहायला मिळत आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळं आरोग्य व्यवस्थेवरही ताण आला आहे. देशातील अनेक राज्यांत ऑक्सिजन, बेड्स, लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतही लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशातच मुंबईत काही ठिकाणी लसीकरण केंद्र बंद पडल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. मुंबईतील बीकेसी येथील लसीकरण केंद्राबाहेरही लसीकरण बंद असल्याचा बोर्ड लावण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर बोलताना मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतल्या लसीकरणाविषयी माहिती दिली. तसेच मुंबईत एकूण 37 ठिकाणी आज लसीकरण सुरु आहे, असं त्यांनी सांगितलं.






















