Solapur Siddheshwar Yatra Bhaknuk : श्री सिद्धेश्वर यात्रेतील भाकणुकीत नैसर्गिक आपत्तीचे संकेत
Solapur Siddheshwar Yatra Bhaknuk : श्री सिद्धेश्वर यात्रेतील भाकणुकीत नैसर्गिक आपत्तीचे संकेत
सोलापुरात श्री सिद्धेश्वर यात्रेत झालेल्या भाकणुकीत नैसर्गिक आपत्तीचे संकेत दिसतं असल्याचे मत मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी व्यक्त केले. तसेच यंदा मुबलक पाऊस पडणार असून, जीवनावश्यक वस्तुंचे दर स्थिर राहणार असल्याचे अंदाज देखील मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी व्यक्त केले. सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील होम विधीचा सोहळा रविवारी रात्री संपन्न झाला. होमविधीचा सोहळा आटोपल्यावर रात्री मानाचे सातही नंदीध्वज मिरवणुकीने डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहासमोर विसावले. या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे भाकणुकीचा कार्यक्रम पार पडला.
दिवसभर उपासी ठेवलेल्या देशमुखांच्या शेतातील वासराला भाकणूकस्थळी आणण्यात आले. वासरु येताच राजशेखर देशमुख यांनी वासराची पूजा केली. सुरवातीलाच वासराने मूत्र आणि मल विसर्जन केले. यावरून भरपूर पाऊस पडणार असल्याचे भाकीत हिरेहब्बू यांनी केले. वासरू सुरवातीपासून बिथरले होते. नैसर्गिक आपत्तीचे संकेत असल्याची माहिती मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी दिली.
"मागील 25 वर्षात मी पहिल्यांदाच वासरूला इतक्या आक्रमक रूपात पाहिले आहे. हे नैसर्गिक आपत्तीचे लक्षण आहे. 1993 साली किल्लारीच्या भुकंप आधी देखील वासरू अशाच प्रकारे बिथरलेले होते. त्यानंतर पाहिल्यांदाच अशा पद्धतीने वासरू बिथरले असून जोरजोरात ओरडत होते. त्यामुळे हे नैसर्गिक आपत्तीचे संकेत देणारे आहे." अशी प्रतिक्रिया मानकरी हिरेहब्बू यांनी दिली.
दरम्यान दिवसभर उपाशी असलेल्या हा वासरासमोर गूळ, गाजर, बोरं, खोबरं, खारीक, पान, सुपारी आणि विविध प्रकाराचे धान्य ठेवण्यात आले. मात्र वासराने कशालाच स्पर्श केले नाही. यावरुन सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर राहतील असा अंदाज मानकरी हिरेहब्बू यांनी व्यक्त केला.
Disclaimer :
सोलापूरच्या सिद्धरामेश्वर यात्रेतील भाकणूक हा भविष्य वर्तवण्याचा पारंपरिक प्रकार आहे, यात्रेला येणाऱ्या हजारो भाविकांचा त्यावर विश्वास असतो, तो त्यांच्या श्रद्धेचा भाग आहे. एबीपी माझा डिजिटल या प्रकाराचं फक्त वृत्तांकन करत आहे, त्यातील कोणत्याही भाकिताचं समर्थन, सहमती किंवा या भाकिताच्या सत्यतेचा दावा करत नाही.