Manikrao Kokate : कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
Manikrao Kokate : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून येत आहे.
Nashik Guardian Minister : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत (Mahayuti) जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी (Maharashtra Guardian Minister List) जाहीर करण्यात आली होती. यात नाशिकमधून गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि रायगडमधून अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांची पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र नाशिकमधून शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे (Dada Bhuse) आणि रायगडमधून भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने अवघ्या एका दिवसात दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित करण्यात आला. त्यातच राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी शिवसेना आणि भाजपच्या वादात उडी घेत नाशिकच्या पालकमंत्रिपदाची मागणी केली होती. आज नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांच्यासाठीच आग्रही असल्याची माहिती समोर आली. आता माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांसमोर आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे.
नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
माणिकराव कोकाटे यांना नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. कोकाटे हे नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही होते. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलंय की, सिंहस्थ कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? काम तर अधिकारीही करतात. बाहेरचा पालकमंत्री असल्यावर स्थानिक पातळीवरील प्रश्न आणि संपर्क यात अडथळे येतात, असे म्हणत त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. आता नाशिकचे पालकमंत्रिपद नेमके कुणाला मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गिरीश महाजनच नाशिकचे पालकमंत्री?
दरम्यान, नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी भाजपच आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मंत्री गिरीश महाजन आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात नाशिकचे पालकमंत्रिपद भाजपकडे ठेवण्यावर चर्चा झाल्याचे समजते. गिरीश महाजन यांनाच पुन्हा नाशिकचे पालकमंत्री करण्यावर भाजपचे नेतृत्व ठाम असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी नाशिक पालकमंत्रिपदाबाबत स्वतः बोलणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नाशिककडे विशेष लक्ष आहे. गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक पालिकेची विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नाशिक पश्चिम, नाशिक मध्य, नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपचेच आमदार आहेत. त्यामुळे नाशिकचे पालकमंत्रिपद भाजप स्वतःकडे ठेवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या