Gajanan Marne | गुंड गजानन मारणेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु
पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेची तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी शक्ति प्रदर्शन करत तळोजा ते पुण्यापर्यंत काढलेल्या मिरवणुकीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एक्सप्रेसवेला शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह जंगी मिरवणूक काढण्याची हिंमत या गुंडांमध्ये येतेच कुठून आणि पुण्यातील मध्यवर्ती भागात दिवसा ढवळ्या झालेल्या हत्येचे पुरावे पोलीस न्यायालयात सादर का करू शकले नाहीत. पोलिसांच्या आशिर्वादाशिवाय हे होणं शक्य नाही अशीच सर्वसामान्यांची या बाबतीतील भावना बनली आहे.
2014 साली पुण्यात झालेल्या दोन हत्यांच्या शिक्षा भोगत असलेल्या गजानन मारणेची सोमवारी सुटका करण्यात आली. त्यांनतर मारणेच्या शेकडो समर्थकांनी पुण्याला येताना एक्स्प्रेसवेवर हैदोस घातला. ओपन कारमध्ये उभ्या असलेल्या गजानन मारणेच्या मागे-पुढे शेकडो गाड्यांचा ताफा होता. एवढंच नाही तर फटाके फोडत, आरडा-ओरडा करत आणि ड्रोनच्या साहाय्याने शुटिंग करत त्याच्या समर्थकांचा धिंगाणा चालू होता. आश्चर्याची बाब म्हणजे, त्यांना त्यावेळी कोणीही अडवलं नाही. हा ताफा पुढे निघून गेल्यावर पोलिसांनी एक्सप्रेसवेचे नियम मोडल्याबद्दल मारणे आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा नोंद केलाय. त्याचबरोबर अवैधरित्या उडवले जाणारे ड्रोन कॅमेरेही जप्त केले आहेत.