पुण्याच्या आंबेगाव आणि मावळ तालुक्यातील बैलगाडा शर्यती रद्द, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर निर्णय
पुण्याच्या आंबेगाव आणि मावळ तालुक्यातील बैलगाडा शर्यती रद्द करण्यात आल्यात. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काल रात्री हा निर्णय घेतलाय. सुरुवातीला शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आंबेगावमधील शर्यत भरवणारच अशी भूमिका घेतली होती. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आढळराव पाटील यांना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील टास्क फोर्सने हा निर्णय घेतल्याची आठवण करून दिलीय. त्यानंतर आज सकाळी आंबेगामधील बैलगाडा शर्यतही रद्द करण्यात आली. आढळराव पाटील आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे संचालक रामकृष्ण टाकळकर यांनी ही माहिती दिली. बैलगाडा शर्यत रद्द करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आढळराव पाटील यांनी ठिय्या आंदोलन केलं. मात्र अर्ध्या तासानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं. बैलगाडा शर्यत रद्द करण्यामागे काहीतरी काळंबेरं असल्याचा आरोप आढळराव पाटील यांनी केलंय.