Pankaja Munde : पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला
बीड : लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघात भाजप नेत्या पंकजा मुडे (Pankaja munde) यांचा 6 हजार मतांनी पराभव झाला. त्यांच्या पराभवाचे पडसाद संपू्र्ण जिल्ह्यात उमटले असून शिरुर, पाथर्डी, परळीसह अनेक ठिकाणी बंदही पुकारण्यात आला होता. या पराभवाचा धक्का सहन न झाल्याने पंकजा मुंडे समर्थकांनी आत्महत्या केल्याच्याही दोन घटना घडल्या आहेत. आता, दिल्लीतील शपथविधी सोहळा आणि पक्षाच्या बैठकांना उपस्थित राहिल्यानंतर पंकजा मुंडे बीडमध्ये (Beed) परतल्या आहेत. त्यानंतर, आज त्यांनी आत्महत्या केलेल्या पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी, त्यांना डोळ्यातील अश्रू रोखणे कठीण झालं झालं. शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन करताना पंकजा यांच्याही अश्रूंचा बांध फुटला.
लोकसभा निवडणुकीतील पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर आत्महत्या केलेल्या युवकाच्या घरी जाऊन पंकजा यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. बीड नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चिंचेवाडी येथील युवक पोपट वायभासे यांनी पराभवाचा धक्का सहन न झाल्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर, आज पंकजा मुंडे यांनी वायबसे यांच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. मात्र, घरातील शोकाकुल वातावर आणि पंकजा मुंडेंना पाहून कुटुंबातील सदस्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यावेळी, पंकजा मुंडेंनाही आपले अश्रू रोखणे अनावर झाल्याचं दिसून आलं. पंकजा मुंडे घरी पोहोचताच कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला, त्यानंतर पंकजा मुंडे यांनाही अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.