Ambadas Danve : अंबादास दानवे उद्धव ठाकरेंच्या मदतीला, मराठा आंदोलकांना केला सवाल : ABP Majha
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन एकीकडे महायुती सरकार कोंडीत सापडले असताना गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलकांनी अचानक विरोधकांनाही जाब विचारायला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी मराठा आरक्षणाबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी, यासाठी मराठा आंदोलकांचा (Maratha Reservation) एक गट सक्रिय झाला आहे. याच गटाने मंगळवारी रमेश केरे पाटील (Ramesh Kere Patil) यांच्या नेतृत्त्वाखाली उद्धव ठाकरे यांना जाब विचारण्यासाठी मातोश्रीवर धडक मारली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही, असा पवित्रा या मराठा आंदोलकांनी घेतला. या आंदोलनाची लाईव्ह प्रक्षेपण सुरु असल्याने क्षणागणिक उद्धव ठाकरे यांची कोंडी होताना दिसत होती. नेमक्या त्याचवेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) हे उद्धव ठाकरे यांच्या मदतीला धावून आले.
मराठा आंदोलकांनी मातोश्रीवर धडक दिल्याचे समजताच अंबादास दानवे तातडीने त्याठिकाणी पोहोचले. यानंतर अंबादास दानवे हे स्वत: मराठा आंदोलकांना सामोरे गेले. तत्पूर्वी मातोश्रीवर ज्यांच्या नेतृ्त्त्वाखाली मोर्चा काढण्यात आला आहे ते रमेश केरे पाटील हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. ते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चेंबरमध्ये काही दिवसांपूर्वी दिसले होते, असे अंबादास दानवे यांनी म्हटले. त्यानंतर अंबादास दानवे मातोश्रीसमोर जमलेल्या मराठा आंदोलकांच्या जमावासमोर गेले. तु्म्ही कोणाच्या सांगण्यावरुन इकडे आलात, मला माहिती आहे, असा थेट हल्ला अंबादास दानवे यांनी चढवला. अंबादास दानवे यांच्या आक्रमक पवित्र्यासमोर आंदोलकांच्या जमावाने आपली बाजू मांडायला सुरुवात केली. आम्ही फक्त उद्धव ठाकरेंच्या घरासमोर नव्हे तर शरद पवार, नाना पटोले आणि मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरही आंदोलन करणार आहोत, असे आंदोलकांनी अंबादास दानवे यांना सांगितले.
त्यावर अंबादास दानवे यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे याबाबत काय करणार? तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जा, हा माझा सल्ला आहे. तुम्ही उद्धव ठाकरे यांची वेळ घेऊन याठिकाणी आले पाहिजे होते. फक्त चार-पाच जणांनी उद्धव ठाकरेंना भेटायला पाहिजे होते. मी साहेबांना भेटीबाबत विचारतो. पण तुम्ही कोणाच्या सांगण्यावरुन याठिकाणी आला असाल तर हे कळालं तर उद्धव साहेब तुम्हाला भेटणार नाहीत. मराठा आरक्षणाबाबतची आमची भूमिका तुम्हाला माहिती नाही का? मी शिवसेनेचा नेता आहे. मराठा आरक्षणाबाबतची भूमिका मी मांडतो. मराठा आरक्षणाबाबतची आमची सुरुवातीपासूनची भूमिका स्पष्ट आहे, असे अंबादास दानवे यांनी सांगताच मातोश्रीसमोरील आंदोलक काहीसे नरमले. त्यानंतर अंबादास दानवे यांनी मी उद्धव ठाकरे यांना विचारुन तुम्हाला कळवतो. पण भेटीसाठी फक्त चार-पाच जणांनाच आतमध्ये येता येईल, असे अंबादास दानव यांनी आंदोलकांना सांगितले.