Western Railwayवर आता 350 ऐवजी 500 लोकल धावणार, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासा
मुंबई लोकल अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु करण्यात आली. त्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर विशेष लोकलच्या 702 फेऱ्या सुरु करण्यात आल्या. मात्र आता पश्चिम रेल्वेने 150 अधिक फेऱ्या चालवण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर आता 350 ऐवजी 500 लोकलच्या फेऱ्या धावतील. या अधिकच्या फेऱ्या 21 सप्टेंबर पासून चालवल्या जातील.
मुंबई पुन्हा रुळांवर आणायची म्हटल्यास आधी मुंबई लोकल सुरु करावी अशी मागणी झाली. त्यामुळे राज्य सरकारच्या विनंतीनुसार मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मुंबई लोकल सुरु करण्यात आली. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, राज्य सरकारचे कर्मचारी यांच्यासाठी सुरु करण्यात आलेली मुंबई लोकल हळूहळू केंद्र सरकारचे कर्मचारी, महानगरपालिका कर्मचारी, राष्ट्रीय बँक कर्मचारी अशा अनेक व्यवसायातील कर्मचाऱ्यांसाठी देखील खुली करण्यात आली. मात्र त्याचा उलटा प्रभाव पडला आणि या लोकलमध्ये देखील गर्दी वाढू लागली. त्यामुळे कोरोना पसरण्याची भीती व्यक्त होऊ लागली. याचा विचार करून पश्चिम रेल्वेने आपल्या लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.