Oxygen Shortage | मुंबईत ऑक्सिजनचा तुटवडा; अनेक रुग्णालयातील रुग्णांना इतरत्र हलवलं
राज्यातील विविध रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. मुंबईतील वांद्रे पश्चिमेत असलेल्या भाभा रुग्णालयातील 33 रुग्णांना काल मध्यरात्री ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे बीकेसीच्या जम्बो कोविड सेंटर आणि इतर कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आलं आहे. अशीच परिस्थिती बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्येही होती. याठिकाणी 31 रुग्ण होते. मशीनवर ऑक्सिजन संपल्याची नोंद मागील दोन दिवसांपासून येत होती. यासोबतच बोरिवली इथल्या भगवती रुग्णालयात देखील अशीच परिस्थिती होती. काल दुपारी 15 आणि रात्री 27 जणांना विविध ठिकाणी दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये 6 जणांना कंदरपाडा जम्बो सेंटर, 23 जणांना दहिसर कोविड सेंटर आणि 11 जणांना शताब्दी रुग्णालयत पाठवण्यात आलं आहे. अजूनही 49 जण भगवती रुग्णालयात उपचार घेत आहेत. जर ऑक्सिजनचा पुरवठा नाही झाला तर यांना देखील हलवण्यात येईल.























