(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manoj Patil : 'मिस्टर इंडिया' बॅाडीबिल्डर मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती स्थिर
मुंबई : 'मिस्टर इंडिया' पुरस्कार मिळवणारा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर बॉडीबिल्डिंगच्या अनेक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केलेल्या मनोज पाटीलने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सध्या त्याच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येतंय. मनोज पाटीलने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली असून त्यामध्ये अभिनेता साहिल खान आपल्या आत्महत्येला जबाबदार असेल असा उल्लेख केला आहे. मनोज पाटीलने ठाण्यातील ओशिवरा पोलीस स्टेशनच्या नावे ही सुसाईड नोट लिहिली असून त्यामधून साहिल खानला योग्य ती शिक्षा मिळावी अशी मागणी केली आहे. साहिल खानने स्टाईल या चित्रपटात काम केलं आहे.
मिस्टर इंडिया मनोज पाटील याने बुधवारी रात्री विषारी गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. रात्री उशिरा कुटुंबियांनी त्याला कूपर रुग्णालयात दाखल केलं. सध्या मनोजची तब्येत स्थिर असल्याची विश्वसनीय सुत्रांची माहिती. पुढील उपचारांसाठी त्याला कूपर रुग्णालयातचं ठेवण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून साहिल खान आपल्याला आणि आपल्या न्युट्रिशन शॉपला विनाकारण टारगेट करत असून त्याचा आपल्याला मानसिक त्रास झाल्याचं मनोज पाटीलने म्हटलंय. आपल्या व आपल्या पत्नीमधील असलेल्या वादाचा फायदा घेऊन तिच्या मदतीने आपल्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकण्याचे कारस्थान साहिल खान करत असल्याचं मनोज पाटीलने म्हटलं आहे. त्यामुळे आपला अमेरिकेला जायचा व्हिसा रद्द होऊ शकेल असंही त्याने म्हटलं आहे.