(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Narayan Rane पुराव्यांसोबत छेडछाड, साक्षीदारांवर दबाव न आणण्याची राणेंना सूचना, वकिलांची प्रतिक्रिया
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात नारायण राणे यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अद्याप तरी नारायण राणे यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
सोमवारी आपल्या जनआशीर्वाद दौऱ्याच्या दरम्यान महाड येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्यावर आज राज्याचं राजकारण तापलं असून ठिकठिकाणी शिवसेनेकडून नारायण राणेंच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.
नाशिक शहराचे शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर नारायण राणेंविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश काढले आहेत. सध्या नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. कालच्या राणे यांच्या वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात नाशिक, पुणे आणि महाडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.