Old Pension Yojana : संपातून प्राथमिक शिक्षण संघाची माघार, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेनंतर संभाजी थोरात
एकच मिशन, जुनी पेन्शन असा नारा देत सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचा एल्गार पुकारलाय. राज्यभरातील सुमारे १८ लाख कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे, राज्यभरातील अनेक शासकीय सेवा ठप्प झाल्यायत. त्यामुळे जनसामान्यांना सरकारी कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत आहेत, तर काही ठिकाणी सर्वसमान्य नागरिकांना ताटकळत बसावं लागतंय. महत्त्वाचं म्हणजे या संपाचा फटका राज्यातील रुग्णांनाही बसतोय. सरकारी रुग्णालयातील नर्स, वॉर्डबॉय आणि इतरही कर्मचारी संपात सहभागी असल्यामुळे केस पेपर काढण्यापासून ते प्राथमिक तपासणीचीही कामं ठप्प झालीयत. त्यातच, या संपामुळे दहावी, बारावीचे निकालही लांबण्याची शक्यता वर्तवली जातेय. कारण, संपाच्या काळात पेपर तपासणीच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा शिक्षकांनी दिलाय. दरम्यान, प्राथमिक शिक्षक संघाने या संपातून माघार घेतलीय. सरकार मागण्या मान्य करण्यास तयार असेल तर, संप कशासाठी? असा सवाल प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संभाजी थोरात यांनी केलाय. त्याचसोबतच मुख्यमंत्र्यांनी जुनी पेन्शन लागू करण्याचं आश्वासन दिलं असून, इतर संघटनांनीही संपातून माघार घेण्याचं आवाहन संभाजी थोरात यांनी केलंय.