Pune News : मुलींना मारहाण, पोलीस गप्प? घटनेची तीन दिवसानंतरही तक्रार का नाही? Special Report
पुण्यातील कोथरूड येथे तीन मुलींनी पोलिसांवर मारहाण आणि जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. या मुलींनी पोलिसांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस आयुक्तालयात सतरा तास ठिय्या दिला. मात्र, पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. छत्रपती संभाजीनगर येथील एका महिलेला सासरच्या त्रासातून मदत केल्याने हे प्रकरण सुरू झाले. त्या महिलेचे सासरे पोलीस दलात निवृत्त अधिकारी आहेत. संभाजीनगर पोलिसांनी पुण्यात येऊन त्या महिलेची चौकशी केली. यावेळी फ्लॅटवरील मुलींना मारहाण, जातिवाचक शिवीगाळ आणि अश्लील भाषेत बोलल्याचा आरोप मुलींनी केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने आमदार रोहित पवार, अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर आणि काही कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तालयाबाहेर आंदोलन केले. पोलिसांनी दिलेल्या पत्रात अट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यासाठी तथ्य नसल्याचे म्हटले आहे. "त्या दलित समाजाच्याच म्हणून त्यांच्यावरती अट्रॉसिटी करतात. त्यांना जातिवाचक शिव्या देतात आणि आता एसपी-सीपी ऑफिसपासून सगळे त्यांच्या सहकाऱ्यांना वाचविण्यासाठी एक अट्रॉसिटी किंवा एक साधी कंप्लेंट पण नाही घेतली. ही आपल्यासमोर ठेवलेली वस्तुस्थिती आहे." असे एका व्यक्तीने म्हटले आहे. या प्रकरणात आता उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे मुलींच्या सहकाऱ्यांनी सांगितले आहे.






















