Nitesh Rane on Sudhakar Badgujar : बडगुजरांचा प्रवास हिंदुत्त्वाच्या दिशेनं, नितेश राणेंची प्रतिक्रिया
Sudhakar Badgujar and Nitesh Rane: ठाकरे गटाचे नाशिकमधील माजी सामर्थ्यशाली नेते सुधाकर बडगुजर हे मंगळवारी दुपारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यांच्या भाजप पक्षप्रवेशाबाबत काहीसा संभ्रम असला तरी सुधाकर बडगुजर आणि त्यांचे कार्यकर्ते आज भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्यावर ठाम आहेत. सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) हे ठाकरे गटात असताना भाजपकडून त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. सुधाकर बडगुजर आणि अंडरवर्ल्ड डॉन सलीम कुत्ता (Salim Kutta) यांचा एका पार्टीतील एकत्र डान्स करतानाचे फोटो समोर आले होते. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी त्यावेळी विधानसभेत हे फोटो दाखवत सभागृह डोक्यावर घेतले होते. त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी केली जाईल, अशी घोषणाही केली होती. मात्र, आता सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब होताच भाजप नेत्यांची भाषा 180 अंशांच्या कोनात बदलेली दिसत आहे. आक्रमक शैलीत विरोधकांचे लचके तोडणाऱ्या नितेश राणे यांनीही सुधाकर बडगुजर यांच्या भाजपमधील प्रवेशाचे स्वागत केले आहे. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हिंदुत्त्वाचा धागा घेऊन आमच्यासोबत कोणीही येत असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करणार. बडगुजर आता 100 टक्के भगवाधारी झाले आहेत. त्यामुळे ते आमच्यासोबत येणार असतील त्यांचे स्वागतच आहे. बडगुजर यांचा हिंदुत्वाच्या दिशेने जोरदार प्रवास सुरु आहे. त्यांचा मुलगा काही दिवसांपूर्वी आम्ही काढलेल्या सकल हिंदुत्व मोर्चात आघाडीवर होता. त्यामुळे आता ते येत असतील तर हरकत नाही, असे नितेश राणे यांनी म्हटले.




















