(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kisan Sabha Morcha | 'वादळ' मुंबईत धडकणार; शेतकरी मार्चाचा कसारा घाटातून प्रवास
मुंबई : अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चानं मुंबईकडे कूच केली आहे. या मोर्चामध्ये ट्रॅक्टर, जीप इत्यादी वाहनांसह हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. 26 जानेवारीला हा मोर्चा राजभवनावर मोर्चा धडकणार आहे. केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 60दिवसांपासून दिल्लींच्या वेशींवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला आहे.
नाशिकच्या ईदगाह मैदानापासून निघालेला किसान सभेचा मोर्चा आज दुपारी मुंबईतील आझाद मैदानात येऊन पोहचणार आहे. हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले असून हे लाल वादळ नाशिक कसारा घाटामार्गे शहापूर तालुक्यातून मुंबईत दाखल होणार आहे. या मोर्चासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यातून हजारो शेतकरी सहभागी होत असल्याची माहिती किसान सभेच्या वतीनं देण्यात आली आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर मुंबईतील आझाद मैदानात देखील पोलीस प्रशासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी मुंबई पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाच्या अनेक तुकडे देखील मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाल्या आहेत.
अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चावर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून ड्रोन कॅमेरा यांचा देखील वापर करण्यात आला आहे. आज मुंबईत आझाद मैदानात मोर्चा दाखल झाल्यानंतर उद्या सकाळी 11 वाजता मुंबईतील आझाद मैदानात भाजप सोडून इतर सर्व पक्षातील नेते एकत्र येणार असल्याची शक्यता आहे. यावेळी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यात येणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. सकाळी 11 वाजता केंद्र सरकारच्या या धोरणाला विरोध केल्यानंतर हा मोर्चा राजभवनाच्या दिशेनं कूच करणार आहे.