Mumbai Costal Road : कोस्टल रोड सर्वांसाठी खुला, शनिवार-रविवार वाहतूक बंद
कोस्टल रोड आजपासून मुंबईकरांच्या सेवेत, शनिवार-रविवार वाहतूक राहणार बंद. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील मुंबईकरांचा प्रवास वेगवान बनवणारा पालिकेचा महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्प आजपासून सेवेत दाखल होत आहे. आज सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालिका अधिकाऱयांच्या उपस्थितीत वरळी ते मरीन ड्राइव्ह मार्गिकेचे लोकार्पण होणार आहे. दरम्यान, मुंबईकरांना या मार्गिकेवरून प्रत्यक्षात मंगळवार, 12 मार्चपासून सकाळी 8 वाजल्यापासून प्रवास करता येणार आहे, तर शनिवारी आणि रविवारी ही मार्गिका बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईत दररोज वाढणाऱया शेकडो वाहनांमुळे प्रचंड वाहतूक काsंडी होत असल्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांनाही डोकेदुखी ठरत आहे. दक्षिण मुंबईत याची तीव्रता अधिक आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंकपर्यंत 10.58 किमीचा कोस्टल रोड बांधण्याचा निर्धार पालिकेच्या माध्यमातून करण्यात आला. ऑक्टोबर 2018 पासून या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. नोव्हेंबर 2023 पर्यंत सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, स्थानिक मच्छीमारांनी पिलरमधील अंतर वाढवण्याची मागणी केल्यामुळे 60 मीटरचे अंतर 120 मीटरपर्यंत वाढवण्यात आले. यामुळे कामात वाढ झाली. शिवाय कोरोनाचा बसलेला फटका, न्यायालयीन कार्यवाहीत गेलेला वेळ यामुळे कोस्टल रोडची नोव्हेंबर 2023ची डेडलाइन आता मे 2024 पर्यंत गेली आहे. मात्र कोस्टल रोडचे एकूण 86 टक्के काम पूर्ण झाल्यामुळे सद्यस्थितीत कोस्टल रोडची एक लेन सुरू करण्यात येणार आहे.