Maratha Reservation : ...तर पुन्हा लढा उभारु : संभाजीराजे
मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन पुन्हा एकदा खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या असल्या तरी महिनाभरात प्रशासनानं त्यावर कार्यवाही केलेली नाही, असं पत्र खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिलं आहे. सरकारनं घेतलेल्या निर्णयांची तात्काळ प्रभावी अंमलबजावणी करावी, अन्यथा आमचा लढा पुन्हा सुरू करू, असा इशारा संभाजीराजे यांनी पत्रातून दिला आहे.
मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी केलेल्या मूक आंदोलनाची दखल घेऊन राज्य शासनाने 17 जून बैठक घेतली. या बैठकीत समाजाच्या मागण्या शासनस्तरावर मान्य करण्यात आल्या. त्यांच्या पूर्ततेसाठी प्रशासनाने मराठा समाजाकडे कालावधी मागितला होता. मात्र एक महिना पूर्ण होऊनदेखील प्रशासनाने यावर कोणतीही पावलं उचललेली नाही. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना संभाजीराजे यांनी पत्र लिहिले आहे.