Petrol Diesel Prices | राज्यातील जनतेला पेट्रोल - डिझेलच्या दरात सवलत मिळण्याची शक्यता
मुंबई : पेट्रोल, डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसात मोठी वाढ झाली. पेट्रोलच्या दरांनी तर शंभरी गाठली. राज्य सरकार आता राज्यातील नागरिकांना दिलासा देण्याचा विचार करत आहे. मार्चमध्ये सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सवलत मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू असल्याची अर्थखात्यातील सूत्रांकडून माहिती मिळत आहे.
पेट्रोल-डिझेलवर राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या सेसमध्ये थोड्याफार प्रमाणात कपात केली जाण्याची शक्यता आहे. येत्या 8 मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील सेस काही प्रमाणात कमी केला जाऊ शकतो. राज्यात पडलेल्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी तेव्हाच्या राज्य सरकारने 2018 साली पेट्रोल आणि डिझेलवर दुष्काळ कर म्हणून 2 रुपये सेस आकारला होता. आता दुष्काळ नसला तरी हा दोन रुपये सेस अद्यापही कायम आहे.