Dr Ravi Godse On HMPV virus : एचएममपीव्हीची व्हायरस नेमका काय आहे? डॉ. रवी गोडसेंनी सविस्तर सांगितलं
Dr Ravi Godse On HMPV virus : एचएममपीव्हीची व्हायरस नेमका काय आहे? डॉ. रवी गोडसेंनी सविस्तर सांगितलं
HMPV Virus in China : जगभरात कोरोनाची (Corona Virus) लाट आली आणि सारं होत्याचं नव्हतं झालं. कोरोनाचा प्रसार चीनमधून (China) झाला होता. अख्ख्या जगानं चीनमुळे कोरोनासारख्या महामारीला तोंड दिलं. तेव्हापासूनच कायम चीनकडे संपूर्ण जगाच्या नजरा खिळलेल्या असतात. अशातच आता चीनमध्ये एक नवा व्हायरल धुमाकूळ घालत असल्याची माहिती मिळत आहे. चीनमध्ये HMPV Virus नं डोकं वर काढलं असून या आजाराची साथच चीनमध्ये पसरल्याची माहिती अनेक माध्यमांनी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देश अलर्ट मोडवर आहेत.
एचएमपीव्ही या व्हायरसच्या चीन देशातील उद्रेकानंतर खबरदारीचा उपाय म्हणून राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाकडून जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक तसेच आरोग्य मंडळातील उपसंचालकांना सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तसेच, घाबरण्याची गरज नाही त्यामुळे भिती पसरवू नका, असा सल्लाही देण्यात आला आहे. तसेच, ही मार्गदर्शक तत्त्व फक्त आणि फक्त दक्षता बाळगण्यासाठी असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
चीनमधून आलेला नवा व्हायरस Human Metapneumovirus (HMPV) बाबत तसं पाहायला गेलं तर, चिंतेचं कारण नाही. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाहक भितीचं वातावरण निर्माण करण्याची गरज नाही, असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे . या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण अधिक गतिमान करुन सर्दी-खोकला अर्थात आयएलआय/सारी रुग्णांचे नियमित सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात यावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागानं राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचं विश्लेषण केलं आहे. 2023 च्या तुलनेत डिसेंबर 2024 मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. दरम्यान, खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावं आणि काय करू नये? या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे.
काय करावं?
- खोकताना किंवा शिंकताना आपलं तोंड आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवावा.
- साबण, पाणी किंवा अल्कोहोलवर आधारित सॅनिटायझरनं आपले हात वारंवार धुवावेत.
- ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
- भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा.
- संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी व्हेंटीलेशन होईल, याची दक्षता घ्या.