Bachchu Kadu on Mahayuti : महायुतील भरगोस यश मिळणार नाही, बच्चू कडूंचा मित्र पक्षांना घरचा आहेर
Bacchu Kadu अमरावती : प्रहार (Prahar) संघटनेचे सर्वेसर्वा आणि अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून वेळोवेळी आपल्या खास शैलीत महायुतीवर (Mahayuti) निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या प्रहारच्या बच्चू कडूंनी अमरावती मतदारसंघ वगळता महायुतीला जाहीर पाठिंबाही दिला आहे. मात्र असे असताना देखील बच्चू कडूंनी महायुतीवर टीकेची झोड उठवण्याची कुठलीही संधी न सोडल्याचे बघायला मिळाले आहे. अशातच राज्यातील पाचही टप्प्यातील मतदानाच्या रणधुमाळीची सांगता झाली आहे. तर येत्या 4 जून रोजी या निवडणुकांचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे. असे असताना परत एकदा आमदार बच्चू कडूंनी महायुतीला घरचा आहेर दिला आहे.
आमदार बच्चू कडूंचा महायुतीला घरचा आहेर
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत कोणाला यश मिळेल असे बच्चू कडू यांना विचारले असता ते म्हणाले की, महायुतीला भरघोस यश मिळणार नाही. महायुतीला ज्याप्रमाणे वाटतं की आपला मोठ्या मताधिक्याने विजय होऊन भरघोस यश मिळेल, मात्र सध्या राज्यात तशी काही परिस्थिती राहिली नाही. लोकांच्या मनात काही प्रमाणात ज्या नाराजी आहे, त्या उघडपणे दिसून आलेल्या आहेत. ही निवडणूक दोन्ही पक्षानी जाती आणि धर्मिकतेवर लढवलेली आहे. त्यामुळे मुद्द्यापासून ही निवडणूक दूर राहिलेली असल्याचे बच्चू कडू म्हणाले. तसेच नेमका निकाल कोणत्या बाजूने लागेल हे सध्या तरी सांगता येत नाही, मतदार सुज्ञ आहे. ते ठरवतील असं देखील बच्चू कडू यांनी बोलताना स्पष्ट केले.