Asha Bhosale Maharashtra Bhushan | पुरस्कार याधीच मिळाला पाहिजे होता : उषा मंगेशकर
मुंबई : आपल्या स्वरांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि असंख्य संगीत प्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजविणाऱ्या आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. आशा भोसले यांचं संगीत क्षेत्रात मोठं योगदान आहे. त्यांनी असंख्य मराठी आणि हिंदी गाणी गायली आहेत.
महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून केली जाते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण निवड समितीची बैठक पार पडली. यावेळी आशा भोसले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आशाताईंचे आभार मानले आहेत.
राज्य सरकारकडून 1996मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. पहिला पुरस्कार महाराष्ट्रचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांना देण्यात आला होता. तर दुसरा पुरस्कार 1997मध्ये गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांना देण्यात आला होता. महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळविणाऱ्या आशा भोसले या मंगेशकर घराण्यातील दुसऱ्या व्यक्ती आहेत.
आशा भोसले यांचा जन्म मंगेशकर कुटुंबातला असून त्यांना मास्टर दीनानाथांचा गाण्याचा वारसा त्यांना मिळाला. लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर या भावंडांचे मार्गदर्शन आणि त्यांची साथ या सगळ्यांतून आशाताईंचा गळा घडत गेला. आशा भोसले यांनी चित्रपट गायनाची सुरुवात माझा बाळ या चित्रपटातून केली. मराठी गाण्यांसोबतच आशाताईंनी बॉलिवूडमध्येही आपल्या स्वरांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. अनेक सदाबहार गाणी त्यांनी सिनेसृष्टीला दिली.