एप्रिल 2019 पासून देशात 2 हजारांच्या नोटेची छपाई नाही; केंद्र सरकारकडून संसदेत माहिती
गेल्या दोन वर्षांत दोन हजार रुपयांची एकही नोट छापण्यात आलेली नसल्याची माहिती केंद्र शासनाच्या वतीनं संसदेत देण्यात आली आहे. एप्रिल २०१९पासून देशात दोन हजार रुपयांच्या नोटेची छपाई झालेली नसल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात स्पष्ट केलं आहे. केंद्र शासनानं पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांचं वितरण थांबवून दोन हजार रुपयांची नोट छापण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पाचशे रुपयांच्या नव्या नोटा छापण्यात आल्या. पण गेल्या दोन वर्षांत दोन हजार रुपयांच्या नोटा मात्र छापण्यात आलेल्या नाहीत. रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानुसार कोणत्या मूल्याच्या नोटा छापायच्या याबाबतचा निर्णय केंद्र शासनाकडून घेण्यात येतो. लोकांकडून होणारी देवाणघेवाण आणि मागणी लक्षात घेऊन कोणत्या मूल्याच्या नोटा छापायच्या याबाबतचा निर्णय होत असतो.