देशाची प्राथमिकता संसदेची नवी इमारत नसून सुसज्ज सार्वजनिक हॉस्पिटल असायला हवं : Amol Kolhe Speech
नवी दिल्ली: राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी केलेल्या भाषणाची चर्चा होतेय. त्यांनी आपल्या सात मिनीटाच्या भाषणात आरोग्य व्यवस्था, युवकांचा रोजगार, सरकारचा खासगीकरणाचा सपाटा, प्रजासत्ताक दिनाचा हिंसाचार आणि शेतकरी आंदोलन अशा विविध मुद्द्यांना स्पर्श केला.
सरकारच्या विविध योजनाचा तळागाळातल्या लोकांना फायदा झाल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात सांगितलं होतं. त्यावर सरकारचे अभिनंदन करत डॉ. अमोल कोल्हे यांनी नव्या संसद बांधणीवर टीका केली. कोरोनाच्या काळात ज्या देशाची आरोग्य व्यवस्था चव्हाट्यावर आली असेल त्या देशाची प्राथमिकता काय असायला हवी असा प्रश्न विचारला. सरकारची प्राथमिकता काय हवी, नवीन संसद भवन की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुसज्ज असं सार्वजनिक हॉस्पिटल असाही प्रश्व त्यांनी विचारला. देशाच्या आरोग्य व्यवस्थेची स्थिती पाहता अगोदर रुग्णालये आणि मग संसद भवन यावर सरकारने आत्मचिंतन करावे अशी विनंती अमोल कोल्हे यांनी केली.
केंद्र-राज्य संबंधाचा मुद्दा उपस्थित करताना खासदार कोल्हे यांनी महाराष्ट्र सरकारच्या हक्काची, जीएसटीच्या परताव्याची सुमारे 25 हजार कोटी रुपये केंद्राकडून येणे बाकी आहे अशी आठवण करुन दिली. ही रक्कम तातडीने देण्यात यावी अशीही त्यांनी मागणी केली.
डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, "नीम आणि नॅशनल अप्राईन्टिस यांसारखी धोरणे देशातील तरुणांसाठी शोषण व्यवस्था ठरली आहे. मुलांना नोकरी लागली की त्यांची लग्ने होतात आणि त्यानंतर त्याला कायम करायला नको म्हणून वर्ष-दोन वर्षांत कंपनी ब्रेक देते. यामुळे त्या तरुणांचे भविष्य अंधःकारमय होते. त्यामुळे या धोरणांचा सरकारने पुनर्विचार करावा."