Afghanistan Crisis : अफगाणिस्तानातील शूटिंगच्या आठवणी; अभिनेते विक्रम गोखले 'माझा'वर
Exclusive : 1992 मध्ये रिलिज झालेल्या 'खुदा गवाह' चित्रपटाची शूटिंग एक महिनाभर अफगाणिस्तानच्या काबूल आणि मजार ए शरीफमध्ये झाली होती. यात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी जेलर रणवीर सेठीची भूमिका केली होती. विक्रम गोखले यांनी एबीपी न्यूजसोबत एक्स्क्लुझिव्ह संवाद साधला. यावेळी त्यांनी चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेसचे अनुभव आणि आताच्या तिथल्या स्थितीबाबत भाष्य केलं.
विक्रम गोखले यांनी सांगितलं की, जेव्हा शूटिंगसाठी गेलो होतो त्यावेळी काबुल एअरपोर्ट वर उतरलो होतो. आम्ही एअरपोर्टवर 24 तास आधी वापरलेली 90 हून अधिक मिसाईल पाहिली होती. शूटिंगच्या वेळी प्रत्येक कलाकाराला हत्यारबंद 2-2 बॉडीगार्ड्स दिले होते. शूटिंग पाहण्यासाठी प्रत्येक ठिकाणी गर्दी व्हायची. अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी लोकं सुरक्षारक्षकांना मार देखील खायचे, असं गोखलेंनी सांगितलं.
'खुदा गवाह' च्या शूटिंग वेळी अफगानिस्तान सरकारने सुरक्षेचा पूर्ण बंदोबस्त केला होता. एवढंच नाही तर त्यावेळच्या सरकारने पूर्ण एका महिन्यासाठी हवाई सुरक्षा देखील पुरवली होती.
गोखले यांनी यावेळी अफगानिस्तानमधील काही लोकांसह सिनेमातील कलाकारांसोबतच्या एका कार्यक्रमाबद्दलही सांगितलं.
अफगानिस्तानमधील खराब स्थितीमुळं कलाकारांना शूटिंगनंतर बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. मात्र तिथल्या हॉटेलमध्ये चांगलं जेवण न मिळल्यामुळं तिथल्या एका ढाब्यावर जाऊन जेवण केलं होतं, अशी एक आठवण देखील गोखले यांनी सांगितली.























