Akshay Kumar votes first time : भारतीय नागरिकत्व मिळल्यानंतर अक्षय कुमारने केलं पहिल्यांदा मतदान
Mumbai Lok Sabha Election Akshay Kumar : देशभरात आज लोकसभा निवडणुकीसाठीचे पाचव्या टप्प्यातील मतदान पार पाडत आहे. या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा जागांसह राज्यातील 13 जागांसाठी मतदान पार पडत आहे. मुंबईकरांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून येत असून अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. सिनेसृष्टीतील कलाकारांनीदेखील सकाळी सकाळी मतदानाचा अधिकार बजावला आहे. बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने आपला मतदानाचा अधिकार बजावला. भारताचे नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाच मतदान केले आहे.
जवळपास महिनाभर प्रचार झाल्यानंतर आज मतदान होत आहे. नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवला पाहिजे यासाठी कलाकारांनी आवाहन केले आहे. भल्या भल्या सकाळी उठून वर्क आऊट आणि आपल्या शूटिंगच्या शेड्युल्डसाठी ओळखला जाणारा अभिनेता अक्षय कुमारनेही जुहू येथील मतदान केंद्रावर मतदानाचा अधिकार बजावला. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अक्षय कुमारने पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, मुंबईकर मतदानाच्या प्रक्रियेत उत्साहाने सहभाग घेतील. आज सकाळी-सकाळी मतदानासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे दिवसभरात चांगले मतदान होईल असा विश्वास अक्षय कुमारने व्यक्त केला.