Zero Hour Uddhav Thackeray : दादर ते ढाका.. . हिंदूंना वाचावा; हिंदुत्वासाठी ठाकरेंचा मविआला रामराम?
नमस्कार मी, विजय साळवी... एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम झीरो अवरमध्ये आपलं स्वागत..
गर्व से कहो हम हिंदू है... अशी गर्जना राष्ट्रीय राजकारणात पहिल्यांदा करणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या आक्रमक शैलीतल्या हिंदुत्वासाठी देशभर ओळखलं जायचं. मंडळी, तो एक काळ होता.. काटक शरीरयष्टी असलेले बाळासाहेब ठाकरे... खांद्यावर भगवी शाल ओढून... जेव्हा मंचावर यायचे.. तेव्हा मुंबईतील शिवाजी पार्क असो.. किंवा परभणीतील इंदिरा मैदान असो.. प्रत्येक ठिकाणी जनसागर ओसंडून वाहात असायचा.. सभांमधून हिंदुत्वाचा एल्गार व्हायचा...
इतकंच काय तर नव्वदच्या दशकात बाळासाहेब ठाकरेंना देशात हिंदुत्वाचा पोस्टरबॉय म्हणून लोकमान्यता मिळाली होती... आणि त्यानंतर हिंदुत्वाच्या बळावर त्यांच्या शिवसेनेला मिळालेली सत्ता.. साऱ्या महाराष्ट्रानं पाहिली.. त्यांच्या आक्रमक हिंदुत्वाचे देशभर चाहते तयार झाले होते.. त्या काळात बाळासाहेबांना मानणारा वर्ग देशभर इतका मोठा होता की उत्तर प्रदेशात त्यांच्या शिवसेनेचा आमदारही विधानसभेत निवडून आला. त्यांनी १९८६ साली विलेपार्लेच्या पोटनिवडणुकीत धर्माच्या मुद्द्यावर प्रचार केला, या कारणामुळं त्यांना सहा वर्षांसाठी मतदानाचा अधिकार गमावला होता..
मंडळी.. हिंदुत्वाच्या त्याच लाटेवर भारतीय जनता पक्ष स्वार झाला.. आणि त्याच हिंदुत्वाच्या एकतेची ताकद आपल्याला आज राष्ट्रीय राजकारणात दिसतेय.
भाजप पक्ष म्हणून मोठां झाला.... तशीच शिवसेनाही राज्यव्यापी बनली.. बाळासाहेबांनीही उतारवयात शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरेंच्या हाती दिलं.. पण, उद्धव ठाकरेंचं नेतृत्व हे बाळासाहेबांसारखं आक्रमक नव्हतं.. उद्धव ठाकरेंचा मूळ स्वभावच शांत.. आणि संयमी आहे. पुढे आदित्य ठाकरेंनीही पक्षाला नव्या पिढीचा.. तरुणांचा पक्ष बनवण्यासाठी अनेक गोष्टी बदलल्या... परिणामी काळाच्या ओघात आणि बदलत्या राजकीय परिस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेची आक्रमकता कमी झाली.. पण पक्ष सत्तेत राहत होता.. अगदी २०१९ सालीही शिवसेनेला भाजपसोबत सत्तेत जाण्याची संधी मिळाली होती. पण, तेव्हा त्यांनी काँग्रेससोबत जात मुख्यमंत्रीपद मिळवलं.. आणि पुढे काय काय झालं.. हे मी काही नव्यानं सांगणार नाही..
पण मंडळी.. गेल्या पाच वर्षात एक गोष्ट मात्र नक्की झाली... ती म्हणजे भाजपकडून आणि एकनाथ शिंदेंकडून प्रामुख्यानं मराठी जनतेच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न झाला.. ती म्हणजे..
उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत जात हिंदुत्व सोडलं.. इतकंच नाही तर बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा वारसाही त्यांनी सोडून दिला..
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा फटका बसला. राज्यातल्या मतदारांनी त्यांना नाकारल्याचं आकडेवारीतून दिसलं..
त्यामुळं महापालिकेच्या आगामी निवडणुका उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या दृष्टीनं अस्तित्व दाखवून देण्याची संधी ठरणार आहे.
त्यातही एखाद्या राज्यापेक्षा मोठं बजेट असलेली मुंबई महापालिका सर्वात महत्त्वाची आहे. गेल्या अडीच दशकांपासून मुंबई महापालिका ही उद्धव ठाकरेंच्या हातात आहे. या मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या काळात कोणत्याही दिवशी जाहीर होईल.. त्यामुळं मुंबई महापालिका आपल्या हातात राखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरेंचाच पॅटर्न हाती घेतल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.