Zero Hour MVA And Mahayuti : महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासाठी खलबतं
झीरो अवरच्या दुसऱ्या सत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. मंडळी विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येतायत तसतशी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमधली जागावाटपासाठीची खलबतं वाढलीयत.
महाविकास आघाडीच्या २०० हून अधिक जागांवर उमेदवार निश्चित झाल्याचं कळतं. म्हणजेच, अंदाजे ८० जागांवरचा तिढा अजूनही कायम आहे असं समजायचं का, असा प्रश्न उपस्थित होतो. लोकसभा निवडणुकीत सांगलीचा एक अपवाद वगळता, जागावाटप बऱ्यापैकी शांतपणे पार पाडणं मविआला जमलं होतं. तसंच महायुतीच्या बऱ्याच आधी त्यांनी आपले उमेदवारही जाहीर केले होते. त्याचा फायदा त्यांना अनेक ठिकाणी झाला, कारण तयारी करण्यासाठी उमेदवारांना पुरेसा वेळ मिळाला. दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई, नाशिक, शिर्डी ही त्याची काही उदाहरणं.
तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे लवकरात लवकर जागावाटप पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमित शाह आज पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज रात्री उशिरा ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीनं अनेक जागांवर घोळ घातला होता. नाशिक, ठाणे, दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई ही त्याची काही उदाहरणं. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत महायुती मागच्या चुका सुधारून वाद चव्हाट्यावर न येऊ देता जागावाटप करणार ते पाहावं लागेल, आणि त्यामध्ये अमित शाहांची भूमिका महत्त्वाची असणार यात तीळमात्र शंका नाही.