Zero Hour Full Ratan Tata : असा 'रतन' पुन्हा होणे नाही, उद्योगजगतातील एका पर्वाचा अंत
नमस्कार, मी विजय साळवी. आपण पाहाताय झीरो अवर. मंडळी, तुम्ही आम्ही प्रत्येकजण एक माणूस म्हणून जन्माला येतो. पण आपण खरोखरच माणूस म्हणून जगतो का? किंवा आपण माणुसकीच्या नात्यानं अवतीभवतीच्या समाजात खरंच वावरतो का? हा प्रश्न तुम्हाला विचारण्याचं कारण ज्येष्ठ उद्योगमहर्षी रतन टाटा यांनी त्यांच्या ८६ वर्षांच्या आयुष्यात निर्माण केलेला माणुसकीचा आदर्श. टाटा समूहाचे प्रमुख या नात्यानं एक यशस्वी उद्योजक अशी त्यांनी जगभरात आपली ओळख निर्माण केली. पण रतन टाटांच्या व्यक्तिमत्त्वातून पैशांच्या श्रीमंतीपेक्षा माणुसकीच्या वैभवाचीच अनुभूती समाजाला कायम आली. टाटा या ब्रॅण्डसोबत नांदणारी विश्वासार्हता हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू होताच, पण त्यासोबत रतन टाटांनी समाजाला कर्तृत्त्व, दातृत्व आणि मानवतेचीही आयुष्यभर शिकवण दिली. ज्यांच्या पायाशी मांडी घालून बसावं आणि चार गोष्टी शिकून घ्याव्यात अशा मोजक्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांपैकी ते एक होते. त्यामुळंच रतन टाटा यांच्या निधनानं टाटा कुटुंबीय आणि टाटा समूह यांच्याइतकंच भारत देश आणि भारतीय समाजाचंही मोठं नुकसान झालंय. रतन टाटा हे भारतीय उद्योगविश्वाचे आधारवड होतेच, पण तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या आणि नेत्याअभिनेत्यांच्या आयुष्यातही त्यांनी आपल्या हयातीत जणू दीपस्तंभाची भूमिका बजावली. रतन टाटा आज आपल्यात नाहीत, पण त्यांनी ८६ वर्षांच्या आयुष्यात तुम्हाआम्हाला दिलेली नीतीमूल्यांची शिदोरी इतकी मोठी आहे की, तुमच्या आमच्यासह पुढच्या कित्येक पिढ्यांनाही ती शिदोरी त्यांच्या आयुष्यभर पुरणार आहे. मंडळी, आजचा हा झीरो अवर शो, रतन टाटा यांच्या कर्तृत्वाला, दातृत्त्वाला आणि नेतृत्त्वाला समर्पित करताना, सुरुवातीला पाहूयात त्यांच्या उद्योगक्षेत्रातल्या कारकीर्दीवर एबीपी माझाचा रिपोर्ट.
तुम्ही पाहताय झीरो अवर... ज्येष्ठ उद्योगमहर्षी रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा अशी विनंती करणारा प्रस्ताव आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीत रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला. महाराष्ट्र सरकारकडून उद्योगरत्न म्हणून दिला जाणारा पुरस्कार यापुढे रत्न पुरस्कार नावानं ओळखला जाणार आहे.. तसंच महाराष्ट्र उद्योग भवनाचं नामांतर देखील रतन टाटा उद्योग भवन असं करण्यात आलंय. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिलीय. रतन टाटा यांच्या रुपानं एक समाजसेवी, द्रष्टा आणि देशप्रेमी मार्गदर्शक आपण गमावला असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शोकप्रस्ताव मांडताना व्यक्त केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची विनंती केली आहे.
झीरो अवरच्या या बुलेटिनमध्ये आपण तूर्तास तरी इथेच थांबूया. पण उद्याच्या झीरो अवरमध्ये पुन्हा भेटूयात संध्याकाळी सात वाजून ५६ मिनिटांनी. बातम्यांच्या अपडेट्ससाठी पाहात राहा एबीपी माझा.