Zero Hour Full Indrayani Bridge Accident : पर्यटकांचा अतिउत्साह की प्रशासन;दुर्घटनेची जबाबदारी कुणाची?
झिरो अवरमध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. आजचा एपिसोड...आजची चर्चा...आजचा झिरो अवर कुंडमळा पूल दुर्घटनेबद्दल आहे, हे तर उघड आहे. पण, कधी कधी वाटतं....या घटना दाखवून, सांगून काय उपयोग? आपल्या सर्वांची सार्वजनिक स्मृती इतकी कमी आहे की या अशा घटना आपण विसरुनही जातो....थोडी फार चर्चा होते, सत्ताधारी-विरोधकांमध्ये आऱोप-प्रत्यारोप होतात...आपण थोडे चिडतो...मग...सगळं पुन्हा रुळावर येतं...आयुष्य सुरुच राहतं....
काल अशीच एक आणखी दुर्घटना घडली...पुण्यात मावळ तालुक्यात कुंडमळा या ठिकाणी इंद्रायणी नदीवरचा ३० वर्ष जुना पूल कोसळला. यात चौघांचा मृत्यू झाला तर, 51 जण जखमी झाले. कुंडमळा हे या परिसरातलं एक पर्यटनस्थळ आहे. त्यामुळं शनिवार-रविवारी पर्यटकांची इथं गर्दी होत असते. कालही अशीच गर्दी होती. या ठिकाणी 100-150 पर्यटक वर्षाविहारासाठी आले असताना इंद्रायणी नदीवरचा लोखंडी पूल कोसळला आणि त्याखाली काही पर्यटक अडकले. ४ जणं या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले, अनेक जखमी झाले. मात्र, काळीज पिळवटून टाकणारी कहाणी आहे विहानची. ६ वर्षांचा विहान आणि त्याचे वडील रोहित माने या कुंडमळा पूल दुर्घटनेचे बळी ठरलेत. या दुर्घटनेत रोहित यांची पत्नीही गंभीर जखमी झालीये.... ६ वर्षांचा विहान...हे काय वय असतं मरण्याचं? गर्दी कुणामुळे झाली आणि किंमत मात्र निष्पाप माने कुटुंबियांनी मोजली. माने कुटुंब पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधलं...रोहित माने हे मंहिंद्रा कंपनीत कामाला होते...सुट्टी असल्यानं ते पत्नी आणि मुलासह कुंडमळा इथं फिरायला आले होते...माने कुटुंबिय आले तसंच अनेक मित्र-मंडळी, जोडपी असं कोण-कोण आलं होतं. कुंडमळाचा हा पूल म्हणजे काही शहरातल्या फ्लायओव्हर, किंवा फूटओव्हर ब्रिड नव्हता. आधीच मोडकळीस आलेला आणि धोक्याची पाटी लावलेला हा पूल इतक्या लोकांचं वजन पेलवू शकला नाही, पूल कोसळू लागला आणि होत्याचं नव्हतं झालं....काही दिवस चर्चा होईल, मृतकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जाईल...लोक विसरुन जातील...मात्र, विहानच्या आईला परत न आलेला आपला जोडीदार आणि आपल्या चिमुकल्या विहानची आई ही हाक पुन्हा ऐकू येणार नाही...ते दु:ख माने कुटुंबिय असोत की असेच आपली माणसं गमावलेली अन्य कुटुंबिय असोत, त्यांना एकट्यानेच सहन करावं लागणार आहे....
बुलेटीनमध्ये पुढे जाण्याआधी पाहुयात आपला आजचा प्रश्न... आणि त्यासाठी जावूयात पोल सेंटरला...
All Shows































