(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Crime : गँग्ज ऑफ भागलपूर ! परिस्थितीमुळे गुन्हेगारीत आलेल्या बिहारच्या तरुणाला नागपुरात अटक
नागपूर : वडिलांची डोळ्यादेखत झालेली हत्या, कुटुंबावर अनेक वर्षांपूर्वी झालेल्या झालेला अन्याय आणि तरीही आरोपी मोकाट. या अवस्थेत सूड घेण्यासाठी एक तरुण गुन्हेगारी जगतात उतरतो. आणि स्वतःची वेळ आल्यानंतर कुटुंबावर झालेल्या अन्यायाची परतफेड करण्यासाठी तो वडिलांच्या मारेकऱ्यांना उघड धमकावतो. असे कथानक आपण चित्रपटांमध्ये नेहमीच पाहतो. मात्र, रिल लाइफची हीच पटकथा नागपुरात रियल लाईफमध्ये घडून आल्याचे पाहायला मिळाले. फरक एवढाच की रिल लाईफमध्ये अशा अँग्री यंग मॅन अभिनेत्याचा नेहमीच विजय होतो. मात्र, नागपुरात रियल लाईफचा त्या अँग्री यंग मॅनला तुरुंगाची हवा खावी लागली आहे.
"तनवीर राका"... या फेसबुक अकाउंटवरून बिहारमधील भागलपूरच्या पोलीस अधीक्षकांना धमकी दिलेली धमकी वाचा.. "भागलपूर के एसपी को चॅलेंज.. राका को पकड के दिखा, राका वापस आ रहा है, हिसाब किताब लेने के लिए".. बॉलीवूड चित्रपटातल्या एखाद्या अँग्री यंग मॅन अभिनेत्याने अन्यायाविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्याला दिलेल्या फिल्मी धमकी सारखीच ही तनवीर राकाची धमकी.
भागलपूरमध्ये अनेक गंभीर गुन्हे नावावर असताना तनवीर राकाने 2017 मध्ये भागलपूरच्या पोलीस अधीक्षकांना फेसबुकच्या माध्यमातून ही धमकी दिली होती. त्यानंतर भागलपूरची संपूर्ण पोलीस यंत्रणा हात धुवून त्याच्या मागे लागली होती. त्यामुळे घाबरलेल्या तनवीरने नागपूरच्या मोमिनपुरा भागात शरण घेतली होती. त्यानंतर गेले साडेतीन वर्ष तनवीर नागपूरच्या मोमिनपुरा परिसरात कापड दुकानांमध्ये काम करून गुपचूप आपला उदरनिर्वाह करत राहत होता. मात्र, काही दिवसांपूर्वी नागपूर पोलिसांना बिहार मधील एक कुख्यात गुन्हेगार नागपूरच्या मोमिनपुरा परिसरात लपून राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली आणि पोलीस तनवीरपर्यंत पोहोचले.
तुरुंगातून सुटल्यानंतर 2017 मध्ये त्याने फेसबुकच्या माध्यमातून भागलपूरच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांना खुलं चॅलेंज केलं. आणि वडिलांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी मी भागलपूरला येत आहे, अशा आशयाची धमकीच दिली. वडिलांच्या मारेकऱ्यांना धडा शिकवण्यासाठी मुंगेर मधून पिस्तूल आणि काडतुस खरेदी केल्याचेही तेव्हा तनवीरने त्याच्या फेसबुक अकाउंटवर जाहीर केले होते. मात्र, तेव्हा भागलपूर पोलिसांनी तनवीरची ती धमकी थेट पोलिस अधीक्षकांसाठी आहे, असं समजून संपूर्ण पोलीस यंत्रणा तनवीरच्या मागे लावून दिली होती. आणि त्यामुळेच तनवीरला भागलपूर सोडावं लागले होते. 2017 मध्ये तो नागपुरात आश्रयासाठी आला होता.
नागपूर पोलिसांच्या ताब्यात असताना तनवीरने आपली संपूर्ण कहाणी नागपूर पोलिसांसमोर सांगितली. आणि त्यानंतर डोळ्या देखत झालेली वडिलांची हत्या, कुटुंबावर झालेल्या अन्यायापायी सहा वर्षाचा एक बालक तरुण झाल्यावर गुन्हेगारी जगतात का आला आणि थेट पोलीस अधीक्षकांना चॅलेंज केल्यामुळे आता तो तुरुंगात पोहोचल्याची सर्व कहाणी समोर आली. चित्रपटातील रिल लाईफमध्ये नेहमीच न्यायाचा विजय होतो. मात्र, रियल लाईफ मधील "तनवीर" ला अठरा वर्षांपूर्वी त्याच्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाबद्दल न्याय तर मिळाला नाहीच उलट पोलीस अधीक्षकांना उघड चॅलेंज केल्याप्रकरणी त्याची रवानगी आता तुरुंगात झाली आहे.