Kurla Bus Accident : कुणी आई.. तर कुणी लेक गमावली; बस अपघातनंतरच्या कथा आणि व्यथा Special Report
कुर्ल्यात झालेल्या बस अपघातानं अनेकांचे प्राण घेतले. या अपघातात कुणी आपलं मुलं गमावली, तर कुणी आपली आई. एका क्षणात अनेक कुटुंब पोरकी झाली. या कुटुंबीयांच्या व्यथा कुणाच्याही हृदयाला पाझर फोडतील अशाच आहेत.
कुर्ल्यातील बस अपघातात ज्यांनी जीव गमावला, त्यांच्या कहाण्या सुन्न करणाऱ्या आहेत. अचानक मृत्यूनं घातलेल्या तांडवामुळं कुणाला आपली लेक, कुणाला आई तर कुणाला पोटचा मुलगा गमवावा लागलाय.
आपल्या लेकाचं लग्न हा कुठल्याही आईच्या आयुष्यातल्या एक अनमोल क्षण.
पंचावन्न वर्षांच्या कणीस फातिमा अन्सारी हाच क्षण आयुष्यभर हृदयात साठवून ठेवण्याच्या तयारीत होत्या.
घरी मुलाच्या लग्नाची तयारी सुरु होती.
मात्र आता हे लग्न त्या कधीच पाहू शकणार नाहीत.
बेस्ट बसचा अपघात झाला, त्याच रस्त्यावर असलेल्या देसाई रुग्णालयात त्या काम करायच्या.
ड्युटीवर जात असताना त्यांना बसनं जोरदार धडक दिली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
लगीनघाई सुरु असणाऱ्या या कुटुंबावर फातिमा यांच्या दुर्दैवी मृत्युमुळं अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळलाय.
आपली आई आता या जगात नाही, यावर त्यांच्या दोन मुलांचा आणि दोन मुलींचा अजूनही विश्वास बसत नाहीय.