Chiplun : पूरग्रस्त चिपळूणचा ग्राऊंड रिपोर्ट, ना अन्नपाणी ना निवारा, कशी काढली चिपळूणकरांनी रात्र?
चिपळूण : गेल्या 24 तासांत अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड येथील परिस्थिती अतिबिकट बनली. चिपळूणला महापुराचा विळखा बसला असून संपूर्ण शहर चहुबाजूने पाण्यात आहे. हजारो लोक पुरात अडकले असून एनडीआरफच्या टीम बचावकार्यासाठी दाखल झाल्या आहेत. चिपळूणच्या कळंबस्ते भागात एका घराच्या छतावर अडकलेल्या 15 जणांची गावकऱ्यांनीच धाडस करुन सुखरुप सुटका केली आहे.
कळंबस्ते भागशाळेजवळ जिथे वाशिष्ठीचा प्रवाह भयंकर आहे तिथे रात्रीपासून 15 माणसे घराच्या छतावर अडकली होती. नदीचा प्रवाह जवळच असल्यानं नदी आणि घर एक आहे अशी स्थिती झाली होती. परिसरातील घरं पूर्ण पाण्यात होती. काल पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत लोकं अडकली होती. यात वृद्धांसह लहान मुलं देखील होती.
इथं अडकलेल्या लोकांशी कुणाचाही संपर्क होत नव्हता. लोकल टीम तिकडं जाण्याचा प्रयत्न करत होती मात्र प्रवाह जास्त असल्याने जाऊ शकली नाही अशी माहिती संबंधितांच्या नातेवाईकांकडून मिळाली होती. चिपळूणमध्ये एमर्जन्सीसाठी दिलेल्या काही फोन नंबरवर फोन केले असता ते देखील नेटवर्क नसल्याने लागत नव्हते. अशात छतावर अडकलेल्या 15 जणांची रात्रीच्या सुमारास गावकऱ्यांनीच धाडस करुन सुखरुप सुटका केली आहे. गावकऱ्यांनी रस्सीच्या मदतीने इथल्या लोकांना बाहेर काढल्याचं निकेत सुर्वे यांनी एबीपी माझा डिजिटलला सांगितलं.