(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chiplun Flood : चिपळुणला पुराचा वेढा! NDRF च्या दोन टीम दाखल, बचावकार्य सुरु असल्याची NDRF प्रमुखांची माहिती
चिपळूणमधील पुराची स्थिती लक्षात घेता आणखी दोन टीम तेथे पाठवण्यात येणार आहेत. मध्यरात्रीपर्यंत एक एक टीम चिपळूण आणि खेडमध्ये दाखलं होतील, अशी माहिती एनडीआरएफ कमांडंट यांनी दिली.
मुंबई : गेल्या 24 तासांत अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड येथील परिस्थिती अतिबिकट बनली. चिपळूणला महापुराचा विळखा बसला असून संपूर्ण शहर चहुबाजूने पाण्यात आहे. हजारो लोक पुरात अडकले असून एनडीआरफच्या टीम बचावकार्यासाठी दाखल झाल्या आहेत.
एबीपी माझाला चिपळूण, खेडमधून अनेक प्रेक्षकांचे मदतीसाठी फोन येत आहेत. या पार्श्वभूमीवरी एबीपी माझाने एनडीआरएफ कमांडंट अनुपम श्रीवास्तव यांच्याची संपर्क साधला. अनुपण श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार चिपळूणमधील पूरपरिस्थिती लक्षात घेत एनडीआरएफच्या दोन टीम आधीच त्याठिकाणी पाठवल्या आहेत. या दोन्ही टीम चिपळूणमध्ये पोहोचल्या असून त्यांनी पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्याचं काम सुरु केलं आहे. चिपळूणमधील पुराची स्थिती लक्षात घेता आणखी दोन टीम तेथे पाठवण्यात येणार आहेत. मध्यरात्रीपर्यंत एक एक टीम चिपळूण आणि खेडमध्ये दाखलं होतील. आणखी मदतीची गरज भासल्यास राज्य सरकारची बातचित करुन आणखी टीम आवश्यकतेनुसार पाठवल्या जातील.
एका टीममध्ये 45 जवान असतात. टीमसोबत पाच बोट, लाईफ जॅकेट, खाण्यापिण्याचं सामान देखील असतं. पुराच्या पाण्यातून लोकांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवलं जाईल, असं अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितलं.
मदतीसाठी नागरिकांना जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा
हजारो लोक पाण्यात अडकले आहेत. पाण्यात अडकलेल्या नागरिकांनी जिल्हा प्रशासनाशी किंवा जिल्हा कंट्रोल रुमशी तात्काळ संपर्क साधावा. एनडीआरएफ देखील जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेत आहे. जिल्हा प्रशासनाला किंवा कंन्ट्रोल रुमला फोन केला तर ती माहिती आम्हाला मिळेल आणि जेणेकरुन आम्ही लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचू, असं आवाहन अनुपम श्रीवास्तव यांनी केलं.
जगबुडी, वशिष्टीसह अनेक नद्यांनी धोका पातळी ओलांडली
रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीची धोका पातळी 7 मीटर असून सध्या ती 9 मीटर वरून वाहते आहे. वशिष्टी नदीची धोका पातळी 7 मीटर असून ती 7.8 मीटर वरून वाहते आहे. काजळी नदी धोका पातळीच्या 1.74 मीटर वरून वाहत असून कोदवली, शास्त्री, बावनदी या नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत. यामुळे खेड, चिपळूण, लांजा, राजापूर, संगमेश्वर या शहरे व परिसरातील गावांमध्ये शासकीय यंत्रणांनी नागरिकांना हलवणे, स्थलांतर करणे व इतर मदत कार्य जोरात सुरु केले आहे.