Paytm च्या कोणत्या सेवा 29 फेब्रुवारीनंतरही सुरु राहणार? जाणून घ्या सविस्तर
आरबीआयने 29 फेब्रुवारीपासून पेटीएम पेमेंट बँकेच्या सेवांवर बंदी घातली आहे. दरम्यान 29 फेब्रुवारीनंतर वापरकर्ते पेटीएमची कोणती सेवा वापरू शकतील याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेवर बुधवार 31 जानेवारी रोजी कठोर कारवाई केली. आरबीआय बँक नियमांच्या कायदा 1949 च्या कलम 35A अंतर्गत पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडच्या (Paytm Payments Bank) सेवांवर बंदी घालण्यात आलीये. आरबीआयच्या नियमांचे पालन न केल्यामुळे पेटीएमवर ही कारवाई करण्यात आलीये. भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, सिस्टिम ऑडिट रिपोर्ट आणि त्यानंतरच्या काही रिपोर्टमध्ये कंपनीने सातत्याने आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याची बाब समोर आली आहे. त्याशिवाय, पेटीएम बँकेशी संबंधित आणखी काही गंभीर गोष्टी समोर आल्या असून भविष्यात आणखी आवश्यक कारवाई करण्यात येणार असल्याचे सूतोवाचही आरबीआयने केले आहे.
आरबीआयच्या या कारवाईनंतर यूजर्स 29 फेब्रुवारीपासून पेटीएम वॉलेट, डिपॉझिट, क्रेडिट, ट्रान्झॅक्शन, टॉप-अप, फास्टॅग पेमेंट, एनसीएमसी कार्ड्स, यूपीआय आणि फंड ट्रान्सफर यांसारख्या अनेक सुविधा वापरू शकणार नाहीत. मात्र, याचा अर्थ पेटीएम सेवेच्या सर्व सुविधा बंद केल्या आहेत असे नाही. आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेच्या सेवांवर बंदी घातली आहे, पण पेटीएमच्या इतर अनेक सेवा 29 फेब्रुवारीनंतरही सुरू राहतील. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
FASTag सुरु राहणार की नाही?
आरबीआयने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, युजर्स 29 फेब्रुवारीपर्यंत FASTag च्या खात्यात उपलब्ध असलेले पैसे तुम्ही वापरु शकता. दरम्यान FASTag विषयी कंपनीने सांगितले की ते इतर बँकेच्या माध्यमातून ही सेवा सुरु ठेवण्याचा प्रयत्न करतील. तसेच याबाबत लवकरच युजर्सना अपडेट दिले जातील.
पेटीएम मर्चंट पेमेंट सेवा सुरु राहणार की नाही?
पेटीएम मर्चंट पेमेंट सेवेवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. याचा अर्थ पेटीएमचे ऑफलाइन पेमेंट नेटवर्क जसे पेटीएम क्यूआर, पेटीएम साउंडबॉक्स, पेटीएम कार्ड मशीन पूर्वीप्रमाणेच काम करत राहिल. तसेच कंपनी नवीन ऑफलाईन व्यापाऱ्यांनाही आपली सेवा देत राहणार आहे.
लोन आणि इंश्युरन्स सेवा सुरु राहणार की नाही?
पेटीएमच्या मते, OCL च्या इतर वित्तीय सेवा जसे की कर्ज वितरण आणि विमा वितरण पेटीएम पेमेंट बँकेशी संबंधित नाही. त्यामुळे Paytm द्वारे देण्यात आलेले कर्ज, क्रेडिट कार्ड, विमा यासारख्या सेवा तशाच सुरु राहतील.
इक्विटी सर्विस सुरु राहणार की नाही?
इक्विटी बुकिंग सेवा पेटीएम मनीद्वारे चालवली जाते. त्यामुळे याबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. परंतु कंपनीने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटलं की, पेटीएम मनी युजर्सनी केलेली गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित आहे. तसेच कंपनीच्या मते आरबीआयच्या कारवाईचा पेटीएम मनी ऑपरेशन्स किंवा वापरकर्त्यांनी इक्विटी, म्युच्युअल फंड, एनपीएसमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर परिणाम होणार नाही. कंपनीने म्हटले आहे की पेटीएम मनी लिमिटेड ही SEBI-नियंत्रित संस्था आहे आणि ती नियमांचे पूर्णपणे पालन करते.
तिकीट, शॉपिंग, खाद्यपदार्थ, खेळ सेवा सुरु राहणार की नाही?
या सर्व सेवांव्यतिरिक्त, पेटीएम ॲपवर उपलब्ध तिकीट बुकिंग, खरेदी, खेळ, खाद्यपदार्थ इत्यादी सेवा देखील सुरू राहतील. परंतु आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्यानंतर पेटीएमच्या इतर बँकांच्या मदतीने वापरकर्त्यांना या सर्व सेवा प्रदान करण्यात येतील.