Reliance आणि Disney Hotstar च्या डीलवर शिक्कामोर्तब; व्यवसायाचं विलिनीकरण 'असं' होणार
Reliance And Disney Update : उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे वॉल्ट डिस्नेमध्ये विलीनीकरण निश्चित झालं आहे.
Reliance And Disney Update : देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स (Reliance) इंडस्ट्रीज लवकरच सर्वात मोठ्या मीडिया कंपन्यांपैकी एक होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वॉल्ट डिस्ने यांच्यातील विलीनीकरणाचा करार अंतिम झाला आहे. विलीनीकरणाबाबत दोन्ही कंपन्या बंधनकारक करारावर सह्या करतील. नव्याने अस्तित्वात येणाऱ्या नवीन कंपनीचे मूल्यांकन 70,000 कोटी रुपये इतके असेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याचाच अर्थ आता Diney+Hotstar लवकरच Jio+Hotstar होण्याची शक्यता आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वॉल्ट डिस्ने यांचे विलीनीकरण पूर्ण झाल्यानंतर, देशात एक मीडिया कंपनी असेल जी 100 हून अधिक चॅनेल, 2 मुख्य OTT प्लॅटफॉर्म आणि देशभरातील 75 कोटी दर्शक असतील.
रिलायन्स OTT वर 11,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार
नव्याने स्थापन झालेल्या कंपनीमध्ये रिलायन्स आणि तिच्या संलग्न कंपन्यांचा एकूण हिस्सा 63.16 टक्के असेल, ज्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज 16.34 टक्के शेअर्स आणि वायकॉम 18 कडे 46.82 टक्के शेअर्स असतील. तर उर्वरित 36.84 टक्के हिस्सा डिस्नेकडे असेल. रिलायन्स आपल्या OTT व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी या संयुक्त उपक्रमामध्ये अंदाजे 11,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी या नवीन मीडिया कंपनीच्या चेअरपर्सन असतील, तर उदय शंकर हे व्हाईस चेअरपर्सन असतील.
मनोरंजनापासून ते खेळापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश
नवीन मीडिया कंपनीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजकडे कंट्रोलिंग स्टेक असेल. तर डिस्नेला त्याच्या इतर काही मीडिया कंपन्यांचे विलीनीकरण करण्याची परवानगीही देण्यात आली आहे. मात्र, यासाठी त्याला नियामक आणि थर्ड पार्टीची परवानगी घ्यावी लागेल. यासह, रिलायन्सच्या इच्छेनुसार देशातील मोठ्या प्रेक्षकांसाठी मनोरंजन आणि क्रीडा कार्यक्रमांबाबत निर्णय घेतले जातील. या डीलनंतर कलर्स, स्टारप्लस, स्टारगोल्ड, स्टार स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स18 यांसारखे चॅनेल एका हाताखाली येतील. तर Jio Cinema आणि Disney + Hotstar सारखे डिजिटल प्लॅटफॉर्म देखील एकाच छताखाली येतील.
डिस्नेच्या कंटेंटवर नवीन कंपनीचे अधिकार असतील
नवीन कंपनीला डिस्नेची 30,000 पेक्षा जास्त कंटेंट मालमत्ता मिळेल. परवान्यासोबतच भारतात डिस्ने बॅनरखाली बनवलेले चित्रपट आणि कार्यक्रम प्रसारित करण्याचे विशेष अधिकार दिले जातील. मुकेश अंबानींनी याला ऐतिहासिक करार म्हटले आहे. भारतीय मनोरंजन उद्योगातील ही एका नव्या युगाची सुरुवात आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :