(Source: ECI/ABP News/ABP Majha)
AI Voice Scam: 47 टक्के भारतीयांना AI Voice Scam चा अनुभव, अहवालातून माहिती समोर
AI Voice Scam: सध्या एखादी गोष्ट टाईप करुन पाठवण्यापेक्षा त्याची व्हॉईस नोट पाठवणे जास्त सोईस्कर होते. परंतु यामुळे AI Voice Scam होत असल्यांच पाहायला मिळत आहे.
AI Voice Scam: आपण सर्वांनी कधीतरी स्वत:च्या बाबतीत किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत खोटे फोन करुन किंवा खोटे मेसेज करुन फसवले गेल्याचं अनुभवलं आहे. हा सायबर गुन्ह्याचाच एक प्रकार आहे. परंतु आता आवाज बदलून हे खोटे मेसेज आणि फोन येत असल्याचं आता समोर येत आहे. याला AI व्हॉईस स्कॅम असं म्हणतात. याच संबंधीचा एक अहवाल समोर आला आहे. या अहवालातून किती टक्के भारतीय या स्कॅमचे बळी पडत आहेत हे देखील समोर आलं आहे.
मॅकॅफीने केलेल्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की सुमारे 47 टक्के भारतीयांनी AI व्हॉईस स्कॅमचा अनुभव घेतला आहे. या अहवलात असे देखील नमूद करण्यात आले आहे की, 83 टक्के भारतीय नागरिकांचे या AI व्हॉईस स्कॅममुळे आर्थिक नुकसान झाले आहे. जवळपास 48 टक्के लोकांना 50,000 रुपयांपेक्षा जास्त नुकसान केले आहे.
या अहवालातून हे स्पष्ट होते की प्रत्येकाचा आवाज वेगळा आहे. परंतु 86 टक्के भारतीयांनी त्यांचा व्हॉईस डेटा ऑनलाइन किंवा रेकॉर्ड केलेल्या नोट्समध्ये आठवड्यातून किमान एकदा सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे, कोणाचा आवाज कसा येतो याचे क्लोनिंग करणे हा आता सायबर गुन्हेगारीचे महत्त्वपूर्ण शस्र ठरत आहे.
काय आहे AI व्हॉईस स्कॅम
AI व्हॉईस स्कॅम म्हणजे आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीचा आवाज वापरुन आपल्याला फोन येतो. आपल्या जवळच्या व्यक्तीचा फोन असल्याने त्या फोनला उत्तर देतो. पण हा प्रकार सायबर गुन्ह्याचाच एक प्रकार आहे. खोटे मेसेज किंवा फोन करुन तर फसवले जातेच पण त्यात आवाज हा आपल्या ओळखीचा असतो.
मॅकॅफीच्या अहवालातून असे समोर आले की, स्कॅमर आवाजात बदल करण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. त्यानंतर बनावट व्हॉइसमेल किंवा व्हॉईस नोट पाठवतात. त्यामुळे 69 टक्के भारतीयांचे असे म्हणणे आहे की त्यांना हा बदल केलेला आवाज ओळखता येत नाही. त्यामुळे या गोष्टीचा वापर दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसून येत आहे.
तसेच 66 टक्के भारतीयांचं असं म्हणणं आहे की, ते या बनावट आवाजाच्या फोनला उत्तर देखील देतात. त्यांना असे वाटते की त्यांच्या जवळच्या व्यक्तीला पैशांची गरज आहे, त्यामुळे लोक या बनावट आवाजावर विश्वास ठेवून त्याला बळी पडतात.
या अहवालानुसार, खोटे मेसेज येण्याचे प्रमाण हे 70 टक्के आहे. तर, खोट्या अपघातांची बातमी, माहिती देणाऱ्या फोनचे प्रमाण 69 टक्के, फोन किंवा पाकीट हरवल्याची माहिती देणारे फोन 65 टक्के आणि तुम्हाला परदेशी जाण्यासाठी येणाऱ्या फोनचे प्रमाण 62 टक्के असल्याचं समोर आलं आहे.
या सर्वेक्षणात असेही आढळून आले आहे की, खोट्या आणि चुकीच्या माहितीचे प्रमाण वाढल्याने लोक ऑनलाइन जे पाहतात त्याबद्दल अधिक सावध झाले आहेत. 27 टक्के भारतीयांनी असे म्हटले आहे की, त्यांचा सोशल मीडियावर पूर्वीपेक्षा कमी विश्वास आहे. तर 43 टक्के भारतीयांना होणाऱ्या स्कॅमबद्दल चिंता वाटत असल्याचं म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
भारतात नव्या विचारांची सुरुवात, प्री वेडिंग किंवा पोस्ट वेडिंग नाही तर घटस्फोटाचे फोटोशूट