बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच, नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
नागराज मंजुळे हे चित्रपटसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक आहेत. त्यांनी सैराट, फ्रँड्री, घर बंदुक बिर्याणी असे दर्जेदार चित्रपट दिलेले आहेत.
पुणे : अतिशय कमी काळात मोठं नाव कमवणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये नागराज मंजुळे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. चित्रपटनिर्मितीसाठी लागणार चौकश दृष्टी, विचार त्यांच्याकडे आहेत. सोबतच ते पुरोगामी विचारांचा वारसाही पुढे घेऊन जाताना दिसतात. वेळ मिळेल तिथे ते समतेचं तत्त्व सांगताना दिसतात. त्यांच्या याच कार्याचा गौरव म्हणून त्यांना समता परिषद या संस्थेतर्फे 2024 सालचा महात्मा फुले समता पुरस्कार देण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो घरी लावल्यानंतर नेमकं काय घडलं होतं? याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
मी आधी खूप वेड्यावाकड्या मार्गावर होतो
आपल्या भाषणात बोलताना, "मी आधी खूप वेड्यावाकड्या मार्गावर होतो. अंधश्रद्धा, भांडण, व्यसनाधीनता याशिवाय आयुष्यात काहीही नव्हतं. आज माझे वडील हयात नाहीत. माझी आई सध्या इथे आहे. माझी आई माझ्या वडिलांची सतत आठवण काढते. माझे वडील दगड फोडायचं, घर बांधण्याचं काम करत होते. माझ्या वडिलांना महापुरूषांशी काहीही देणंघेणं नव्हतं. त्यांचे आपले-आपले छोटे-छोटे देव होते. खूप सारी अंधश्रद्धा होती. त्यांचे आपापले समज होते. स्वत:च्या विचारांच्या चिखलातच अडकलेले हे सगळे लोक होते. अशा घरात मी जन्मलो होतो," असं नागराज मंजुळे यांनी सांगितले.
आंबेडकरांचा फोटो तू घरात का लावतो?
तसेच, "या विचारात बदल व्हावा यासाठी मी मात्र प्रचंड भांडायचो. आई याची साक्षीदार आहे. मी जेव्हा बाबासाहेबांचा फोटो माझ्या घरात लावला होता. तेव्हा जवळजवळ महिनाभर माझे आणि माझ्या वडिलांचे भांडण झाले. आंबेडकरांचा फोटो तू घरात का लावतो, असं मला वडील विचारायचे. वडार जातीत एखादा महापुरूष जन्मला पाहिजे आणि त्याचाच फोटो मी घरात लावला पाहिजे, अशी काही लोकांची धारणा असते. प्रत्येकाने आपापाल्या जातीचा महापुरुष वाटून घेतला तर त्याला काही अर्थ नाही," अशा भावना मंजुळे यांनी व्यक्त केल्या.
फुलेंनी काय-काय केलं हे वडिलांना सांगायचो
सोबतच, मी माझ्या वडिलांना भांडून घरात बाबासाहेबांचा फोटो लावला. माझ्याकडे महात्मा फुले यांचा भोटो नव्हता. मी फुलेचं पेन्सिलने चित्र काढलं होतं. हे चित्र काढताना मी माझ्या वडिलांना फुलेंनी काय-काय केलं हे सांगायचो, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, या पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त आमदार छगन भुजबळ उपस्थित होते.
Nagraj Manjule Video News :
हेही वाचा :