
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar: जाणत्या राजाने जनाधार गमावलाय, आता त्याने घरी बसावं; विखे-पाटलांची शरद पवारांवर बोचरी टीका
Radhakrishna Vikhe Patil: विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर भाजप नेत्यांचा आत्मविश्वास कैकपटीने वाढला आहे. गोपीचंद पडळकर यांच्यापाठोपाठ विखे-पाटलांची शरद पवारांवर टीका

अहिल्यानगर: शरद पवार हे जाणते राजे आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांनी जनाधार गमावला आहे. त्यामुळे आता शरद पवारांनी (Sharad Pawar) घरी बसावं, अशी बोचरी टीका भाजपचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली. शरद पवार यांनी लोकांचे वाटोळे केले. त्यांनी आता जनता आणि राज्याचं आणखी वाटोळं करु नये, असेही विखे-पाटील यांनी म्हटले. मुंबईतील पक्षश्रेष्ठींच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखे पाटील गुरुवारपासून मतदारसंघात सक्रिय झाले. त्यांनी अहिल्यानगरमधील लोणी येथे ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रेच्या नियोजनासाठी ग्रामस्थांसोबत बैठक घेतली.
यावेळी त्यांनी ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांनाही फटकारले. लोकसभा निवडणुकीत मविआला घवघवीत यश मिळाले, महायुतीची पिछेहाट झाली होती. त्यावेळी EVM बाबत शंका व्यक्त का केली नाही ? EVM वर विश्वास नाही म्हणून त्यांच्या खासदारांनी त्यावेळी राजीनामा देवून टाकायला हवा होता. निवडणूक नाकारायला हवी होती. जनमत बाजूने असलं की EVM चांगलं आणि विरोधात गेल की EVM वाईट, असे विरोधकांचे धोरण असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले.
माझ्यावर ग्रामदैवत म्हसोबा महाराजांचा नेहमीच आशीर्वाद राहिला आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचा देखील आशीर्वाद आहे. मला दिलेल्या संधीचं मी चांगल काम करुन दाखवलं आहे. तो विश्वास पुन्हा पक्षनेतृत्व व्यक्त करेल, अशी अपेक्षा विखे-पाटील यांनी व्यक्त केली.
एकनाथ शिंदेंच्या नाराजीबाबत विखे-पाटील काय म्हणाले?
राज्यात पुन्हा मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. हा दावा राधाकृष्ण विखे-पाटील यांनी फेटाळून लावला. माध्यमांनी हे रान उठवलंय की एकनाथ शिंदे नाराज आहेत. ते नाराज असण्याचं काही कारण वाटत नाही. पक्षनेतृत्व जो निर्णय देईल, तो मी मान्य करील अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आमची पहिली पसंती हि देवेंद्र फडणवीस यांनाच आहे, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले.
मंत्रीपदाबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार देवेंद्र फडणवीस यांनाच आहेत. त्यामुळे वेगळं मागण्याचं कारण नाही. पक्ष नेतृत्वाचा जो माझ्याबद्दल विश्वास आहे, त्यावरुन मला ते निश्चितपणे चांगली जबाबदारी देतील, याबद्दल माझ्या मनात शंका नाही, असे विखे-पाटील यांनी सांगितले.
...तर नगर जिल्ह्यात 12-0 ने जिंकलो असतो: राधाकृष्ण विखे-पाटील
श्रीरामपुरमध्ये महायुतीच्या आपआपसातील मतभेदामुळे जागा गेली. ती जाण्याचं कारण नव्हते. दुर्दैवाने राम शिंदे यांचादेखील फार कमी फरकाने पराभव झाला. तेथे काही स्थानिक परिस्थिती उद्भवली असेल. नाहीतर जिल्हा हा 12 - O केला असता. बाळासाहेब थोरातांचं जे स्वप्न होत जिल्हा 12 - 0 झाला पाहिजे, ते आम्ही निश्चितच पूर्ण केले असते, असा टोला विखे-पाटील यांनी लगावला.
महाविकास आघाडीत पराभव झाल्यानंतर एकमेकांवर खापर फोडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या पळवाटा शोधण्याचे काम सुरु आहे.
जनाधार गमावलाय ते कुठं तरी मान्य करा. उद्धव ठाकरेंनी मोदी आणि शहांबाबत बेताल विधानं केली. एवढं बेताल विधान करणारा मी पाहिला नाही. त्याचं शासन त्यांना लोकांनी दिलय, असेही विखे-पाटील यांनी म्हटले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
