Twitter: आता वापरता येणार अॅड फ्री ट्विटर, कंपनी आणतेय नवं सबस्क्रिप्शन मॉडेल; एलन मस्क यांचा नवा प्लान काय?
Twitter Advertising: ट्विटरवर सारख्या त्रास देणाऱ्या जाहिराती लवकरच बंद होणार आहेत. यावर कंपनी काम करत असून लवकरच नवं सबस्क्रिप्शन मॉडेल सादर केलं जाणार आहे.
Twitter Advertising: ट्विटरचे (Twitter) मालकी हक्क घेतल्यापासूनच ट्विटरचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) अनेक नवनवे बदल घडवून आणत आहेत. आता ट्विटरवर आणखी एक नवा बदल करण्याच्या तयारीत आहे. हा नवा बदल ट्विटरवरील जाहिरातीसदंर्भात आहे. एलन मस्क यांचं म्हणणं आहे की, ट्विटर प्लॅटफॉर्मवर दिसणाऱ्या जाहिरातींची साईज आणि फ्रीक्वेंसी सुधारण्याची गरज आहे. तसेच, जाहिराती कमी करण्यासाठी, आम्ही अधिक किंमतीचे सबस्क्रिप्शन मॉडेल सादर करण्याचा विचार करत आहोत. जे युजर्सना कोणत्याही जाहिरातींशिवाय ट्विटर वापरण्याची परवानगी देईल. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मस्क यांनी ट्वीटसाठी बुकमार्क फिचर आणण्याची घोषणा केली होती. लवकरच हे फिचर युजर्ससाठी रोलआउट केलं जाऊ शकतं.
मस्क यांची ट्विटरवरुन माहिती
मस्क शनिवारी ट्विटरवर म्हणाले, "ट्विटरवरील जाहिरातींची साईज आणि फ्रीक्वेंसी खूप मोठी आहे. येत्या आठवड्यात दोन्ही कमी करण्यासाठी ठोस पावलं उचलली जात आहेत. तसेच, आम्ही अधिक किमतीचे सबस्क्रिप्शन मॉडेल लॉन्च करणार आहोत. जेणेकरून कोणत्याही जाहिराती येणार नाहीत." दरम्यान, जाहिराती कमी करण्यासाठी काय केलं जाईल किंवा नव्या मॉडेलची किंमत काय असेल? याबाबत अद्याप एलन मस्क यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.
Ads are too frequent on Twitter and too big. Taking steps to address both in coming weeks.
— Elon Musk (@elonmusk) January 21, 2023
एलोन मस्क यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ट्विटरची सूत्रं हाती घेतली होती. तेव्हापासूनच, मायक्रो-ब्लॉगिंग साईटच्या एका बाजूला, युजर्सचा एक्सपिरियन्स सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे, ते ट्विटरचे उत्पन्न वाढवण्याचाही विचार करत आहे. यासाठी त्यांनी ट्विटरवर अनेक नवीन फीचर्स जोडले आहेत.
मालकी घेतल्यापासूनच अनेक महत्त्वाचे बदल
मस्क यांनी नुकतंच 'ट्विटर ब्लू' सबस्क्रिप्शन सुरू केलं आहे. ट्विटरवर केवळ जाहिरातींवर अवलंबून राहू शकत नाही, असं मस्क यांनी कंपनी विकत घेतानाच स्पष्ट केलं होतं. त्यानंतर कंपनीनं पेड ब्लू सबस्क्रिप्शन सुरू केलं. कंपनी तिच्या जाहिरातींच्या कमाईतील तोटा भरून काढण्यासाठी धडपडत आहे. कारण ब्रँड्स आपल्या मॉडरेशन धोरणांबद्दलच्या चिंतेमुळे साईटमधून बाहेर पडत आहेत. मस्क यांनी म्हटलं आहे की, प्लॅटफॉर्म 'फ्री-फॉर-ऑल हिलस्केप' बनू इच्छित नाही.
ट्विटरनं अलिकडेच सतत धोरणात्मक बदल करून राजकीय जाहिरातींवरील तीन वर्षांची बंदी शिथिल केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ट्विटरनं जाहिरातींमध्ये काम करणाऱ्या सुमारे 40 डाटा वैज्ञानिक आणि इंजिनिअर्सना काढून टाकलं आहे.
ट्विटर बुकमार्क फिचर
आणखी एक नवीन फीचर ट्विटर बुकमार्क लवकरच ट्विटरवर रिलीज होत आहे. एलन मस्क यांनी ट्वीट केलंय की, ट्वीट बुकमार्क म्हणून सेव्ह केलं जाऊ शकतं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, बुकमार्क पूर्णपणे खाजगी राहील, म्हणजेच इतर कोणताही युजर तुम्ही केलेले बुकमार्क ट्वीट पाहू शकणार नाही, जरी ट्वीट बुकमार्क म्हणून सेव्ह केलं गेलं असलं तर, मात्र किती लोकांनी ते ट्वीट बुकमार्क केलंय हे युजर्सना कळणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Twitter Blue: ट्विटरच्या ब्लू टिकसाठी आता महिन्याला 900 रुपये मोजावे लागणार, ट्विटरची नवी घोषणा