Twitter Blue: ट्विटरच्या ब्लू टिकसाठी आता महिन्याला 900 रुपये मोजावे लागणार, ट्विटरची नवी घोषणा
गुगलचे अॅंड्रॉईड (Android) यूजर्स आणि अॅपलच्या (Apple) iOS यूजर्ससाठी सबस्क्रिप्शनची किंमत समान ठेवण्यात आली आहे.
मुंबई: इलॉन मस्क यांच्या मालकीच्या ट्विटरने अॅंड्रॉईड (Android) साठी ट्विटर ब्लू टिक (Twitter Blue) सबस्क्रिप्शनची किंमत जाहीर केली आहे. अॅंड्रॉईड वापरकर्त्यांसाठी आता ब्लू टिकसाठी महिन्याला 11 डॉलर्स म्हणजे जवळपास 900 रुपये मोजावे लागणार आहेत. ही किंमत iOS सदस्यांसाठी समान आहे. मासिक शुल्काच्या तुलनेत ट्विटरकडून वेब वापरकर्त्यांसाठी मात्र स्वस्त वार्षिक योजना जाहीर करण्यात आली आहे.
गुगलच्या (Google) अॅंड्रॉईड (Android) यूजर्ससाठी सबस्क्रिप्शनची जी किंमत ठेवण्यात आली आहे तीच किंमत अॅपलच्या (Apple) iOS यूजर्ससाठी आकारण्यात येईल असं कंपनीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
जगभरातील राजकारणी, प्रसिद्ध व्यक्ती, पत्रकार आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या महत्त्वाच्या व्यक्तींना ट्विटरकडून ब्लू टिक देण्यात येते. त्यामुळे या लोकांचे नेमक्या अकाउंटची माहिती मिळते आणि त्यांच्या फॉलोअर्ससाठीही हे सोयिस्कर ठरतं. पूर्वी ही सेवा विनामूल्य होती. इलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी हाती घेतल्यानंतर आता यामध्ये बदल करण्यात आला. ट्विटरच्या ब्लू टिकसाठी सबस्क्रिप्शन फी आकारण्याची घोषणा इलॉन मस्क यांनी केली होती. आता ब्लू टिकसाठी महिन्याला 11 डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयात जवळपास 900 रुपये मोजावे लागणार आहेत.
गेल्या काही वर्षांपासून ट्विटरचे आर्थिक व्यवस्थापन बिघडत चालल्याचं चित्र होतं. इलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर ट्विटरवर जाहिरातदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी ट्विटरवरील ब्यू टिक ज्यांना देण्यात आली आहे त्यांच्याकडून फी आकारण्याचा निर्णय घेतला.
ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनसाठी वार्षिक योजनेची किंमत 84 डॉलर्स इतकी आहे. युनायटेड स्टेट्स, कॅनडा, युनायटेड किंगडम, जपान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासह इतर काही देशांमध्ये वेब वापरकर्त्यांसाठी सवलत उपलब्ध असेल असं ट्विटरने म्हटलं आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरच्या सुरुवातीला, इलॉन मस्क म्हणाले होते की, ट्विटरच्या मूळ ब्लू टिकमध्ये जाहिरातींची संख्या निम्मी असेल आणि पुढील वर्षापासून जाहिरातीची संख्या वाढवण्यात येईल. इलॉन मस्क यांनी गेल्या वर्षी 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटरची खरेदी केली. त्यानंतर इलॉन मस्क यांनी सोशल मीडिया कंपनीमध्ये अनेक बदल केले आहेत.
ही बातमी वाचा: