युजवेंद्र चहल भारताचा पहिला Concussion सबस्टिट्यूट
युजवेंद्र चहल Concussion (कन्कशन) सबस्टिट्यूट या आयसीसीच्या नव्या नियमानुसार चहल दुखापतग्रस्त रविंद्र जाडेजाच्या जागी मैदानात उतरला.
India vs Australia T20: टीम इंडियानं कॅनबेराच्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात ऑस्ट्रेलियाला 11 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात लेग स्पिनर युजवेंद्र चहलनं मोलाची भूमिका बजावली. पण महत्वाची बाब अशी की सामन्याच्या सुरुवातीला अंतिम अकरामध्ये युजवेंद्र चहलचा समावेश नव्हता. पण Concussion (कन्कशन) सबस्टिट्यूट या आयसीसीच्या नव्या नियमानुसार चहल दुखापतग्रस्त रविंद्र जाडेजाच्या जागी मैदानात उतरला. आणि त्यानं पूर्ण चार षटकं गोलंदाजीही केली आणि ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं.
जाडेजाला दुखापत, चहल मैदानात
भारतीय डावाच्या अखेरच्या षटकात मिचेल स्टार्कचा उसळता चेंडूत फलंदाजी करणाऱ्या रविंद्र जाडेजाच्या डोक्याला लागला. त्यामुळे जाडेजाला क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर जाता आलं नाही. त्यामुळे Concussion सबस्टिट्यूट नियमानुसार कर्णधार विराट कोहलीनं युजवेंद्र चहलला मैदानात उतरवलं. हा नियम लागू झाल्यापासून युजवेंद्र चहल हा Concussion सबस्टिट्यूट म्हणून खेळणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला.
काय आहे हा नियम?
कन्कशन सबस्टिट्यूट हा नियम जुलै 2019 पासून आयसीसीनं लागू केला. 1 ऑगस्ट 2019 पासून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघातल्या अॅशेस मालिकेपासून हा नियम प्रत्यक्ष अंमलात आला. सामन्यादरम्यान एखाद्या फलंदाजाच्या डोक्याला चेंडू लागून दुखापत झाल्यास हा नियम लागू होतो. Concussion सबस्टिट्यूट म्हणून मैदानात आलेला खेळाडू गोलंदाजी किंवा फलंदाजीही करु शकतो.
ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जस्टिन लँगर यांचा आक्षेप
दरम्यान सामना सुरु असताना ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी चहलला गोलंदाजी देण्यावरुन आक्षेप नोंदवला. कारण हेल्मेटवर चेंडू आदळल्यानंतरही जाडेजानं मैदानात तळ ठोकत फलंदाजी केली आणि तो नाबादही राहिला. नेमकं याच मुद्यावर बोट ठेऊन लँगर यांनी चहलच्या गोलंदाजी करण्यावर आक्षेप घेतला. यासाठी सामनाधिकारी डेव्हिड बून यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. पण नियमाप्रमाणे चहलला Concussion सबस्टिट्यूट म्हणूनच खेळवण्यात आलं.
ऑस्ट्रेलियाचा लाबुशेन पहिला Concussion सबस्टिट्यूट
गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघांमधल्या अॅशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला जबर दुखापत झाली होती. इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरचा उसळता चेंडू लागून स्मिथ मैदानातच कोसळला. याच सामन्यात स्मिथच्या जागी मार्नस लाबुशेन हा राखीव खेळाडू Concussion सबस्टिट्यूट म्हणून क्रिकेटच्या मैदानात पहिल्यांदा उतरला होता.