Sheikh Hasina : बांगलादेश सोडून भारतात आलेल्या माजी पीएम शेख हसीनांचा सहा दिवसांनी सनसनाटी दावा; अमेरिकेवर गंभीर आरोप
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना हसीना म्हणाल्या, "मी त्यांना कधीच रझाकार म्हटले नाही. देशात अस्थिरता आणण्यासाठी माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावण्यात आला.
Sheikh Hasina on Bangladesh Violence : बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर सहा दिवसांनी शेख हसीना (Sheikh Hasina on Bangladesh Violence) यांनी अमेरिकेला सेंट मार्टिन बेट न दिल्याने आपले सरकार पाडले आहे, असे म्हटले आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, हसीना आपल्या जवळच्या सहाय्यकांना म्हणाल्या, "मला कट्टरतावादी हिंसाचारामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढू द्यायची नव्हती. त्यांना विद्यार्थ्यांच्या मृतदेहांपासून सत्ता मिळवायची होती. पण मी ते होऊ दिले नाही." हसीना म्हणाल्या की, "सेंट मार्टिन बेट आणि बंगालचा उपसागर अमेरिकेच्या ताब्यात देऊन मी माझी खुर्ची वाचवू शकले असते. मी देशवासियांना कट्टरपंथीयांकडून दिशाभूल न करण्याचे आवाहन करते. अल्लाहच्या कृपेने मी लवकरच बांगलादेशात परतेन."
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना हसीना म्हणाल्या, "मी त्यांना कधीच रझाकार म्हटले नाही. देशात अस्थिरता आणण्यासाठी माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. बांगलादेशातील लोकांच्या निर्दोषतेचा फायदा घेऊन हे षडयंत्र रचले गेले आहे." राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच हसिना यांनी या प्रकरणी विधान केले आहे.
हसिना म्हणाल्या होत्या, अमेरिकची सेंट मार्टिन बेटाची मागणी
यापूर्वी जून 2021 मध्ये बंगाली वृत्तपत्रांमध्ये असा दावा करण्यात आला होता की अमेरिका बांगलादेशकडून सेंट मार्टिन बेटाची मागणी करत आहे. त्याला येथे लष्करी तळ बांधायचा आहे. यानंतर बांगलादेश वर्कर्स पार्टीचे अध्यक्ष राशिद खान मेनन यांनीही संसदेत सांगितले की, अमेरिका सेंट मार्टिन बेट ताब्यात घेऊ इच्छित आहे आणि ते क्वाडचे सदस्य होण्यासाठी दबाव आणत आहे. बांगलादेशी राजकारणात एवढा खळबळ उडवून देणारे सेंट मार्टिन बेट हे केवळ 300 चौरस किमीचे बेट आहे. म्यानमारपासून त्याचे अंतर फक्त 5 मैल आहे. जून 2023 मध्ये पीएम हसिना म्हणाल्या होत्या की विरोधी बीएनपी पक्ष सत्तेत आल्यास सेंट मार्टिन विकू.
बांगलादेशातील 52 जिल्ह्यांमध्ये हिंदूंवर 205 हल्ले
बांगलादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हिंदू समुदायावरील हल्ले वाढत आहेत. आतापर्यंत 52 जिल्ह्यांमध्ये हिंदूंवर हल्ल्याची 205 प्रकरणे समोर आली आहेत. शनिवारी बांगलादेशचे अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी याचा निषेध केला. ते म्हणाले, "अल्पसंख्याकांवरील हल्ले हा एक घृणास्पद गुन्हा आहे. बांगलादेशात राहणाऱ्या हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध समाजातील लोकांचे रक्षण करणे हे देशातील तरुणांचे कर्तव्य आहे." बांगलादेशच्या बेगम रोकेया विद्यापीठाला संबोधित करताना युनूस म्हणाले, "विद्यार्थ्यांनी या देशाला वाचवले आहे. ते अल्पसंख्याकांचे रक्षण करू शकत नाहीत. तेही आपल्या देशाचे नागरिक आहेत. आपल्याला एकत्र राहायचे आहे."
युनूस म्हणाले, बांगलादेश तरुणांच्या हातात
युनूस म्हणाले की, बांगलादेश आता तरुणांच्या हातात आहे. बांगलादेशी मीडिया डेली स्टारच्या मते, शनिवारी हजारो हिंदू आंदोलकांनी ढाका आणि चितगावमध्ये रस्ते अडवले. त्यांनी त्यांच्या घरांवर, दुकानांवर आणि मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध केला. यावेळी आंदोलकांनी ‘हिंदूंचे रक्षण करा’, ‘आम्हाला न्याय हवा’, ‘देश सर्व नागरिकांचा आहे’ अशा घोषणाही दिल्या. त्यांनी विचारले की हिंदूंची घरे आणि मंदिरे का लुटली जात आहेत? मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या पक्ष अवामी लीगच्या दोन हिंदू नेत्यांची हत्या करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या